Political War : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शाब्दिक युध्द रंगलेले दिसते. महाराष्ट्राच्या एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतृप्त आत्मा भटकत आहे, असा घणाघात केला होता. याच धर्तीवर विकासकामांवरुन आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली दिसते. भाजप समर्पित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी अदृश्य शक्तीमुळे उड्डाणपूलाचे काम रखडले, असा आरोप केला होता. या आरोपाच्या प्रत्युत्तरात सोशल मिडीयावर ‘ही आमदाराची लाचारी’ अशी चित्रफित प्रसारित केली जात आहे.
आमदार अग्रवाल यांच्या वक्तव्याने गोंदियाचे राजकारण पेटले गेले आहे.आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकीची खमंग चर्चा सुरू झाली आहे.
गोंदिया शहरात जुना उड्डाणपूल जमीनदोस्त करून नवीन उड्डाणपुलाला मंजूरी मिळाली. सहा महिन्यापूर्वी कंत्राटदाराला कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. त्यातच आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी छोटेखानी कार्यक्रमातून भुमिपूजन आटोपून घेतले. मात्र अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राट कंपनीला प्रत्यक्षात काम सुरू करण्याचा मुहूर्त सापडला नाही.
नागरिकांकडून संताप व्यक्त
शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. उड्डाणपुलाचे बांधकाम केव्हा सुरू होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.याची दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी कंत्राट कंपनीला धारेवर धरून काम सुरू न करण्यामागचे कारण काय? असा सवाल केला.
सोशल मीडियावर चर्चा त्या अज्ञात शक्ती चा
एवढेच नाही तर सोशल मिडीयावर चित्रफितीच्या माध्यमातून कुणीतरी अज्ञात शक्ती या बांधकामात अडथळा निर्माण करीत आहे असाही आरोप केला. यावर गोंदिया शहरात ती अदृश्य शक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित करून नागरिक उत्तर शोधू लागले. तर दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या आरोपाच्या प्रत्युत्तरात सरकार तुमचे, तुम्ही सरकारात तरीही काम सुरू होत नसेल तर आमदाराची लाचारी नाही काय? असा प्रत्यारोप करीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करून सोशल मिडीयावर चित्रफित प्रसारीत करण्यात आली.
RPI on Congress : वंचितांचे आरक्षण कायम राहील, मोदींनी वारंवार स्पष्ट केले
यामुळे अदृश्य शक्तीवर लाचारीचा वार याप्रमाणे गोंदिया विधानसभा क्षेत्रात शाब्दिक युध्द सुरू झाले आहे. काही सुज्ञ नागरिक विकासकामात अदृश्य शक्तीच्या माध्यमातून अडथळा निर्माण करणारा खलनायक ‘कोण? हे देखील कळू द्या, असे बोलू लागले आहेत. दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल हे जरी चाबी संघटनेच्या माध्यमातून अपक्ष आमदार असले तरी त्यांचे 5 वर्षातील ‘भाजप प्रेम’ आणि भाजपला सतत पाठिंबा देण्यामागचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकंदरीत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या प्रचार अभियानात देखील महायुतीमधील घटक पक्षातील ‘तीन तिगाडा-काम बिगाडा’ ही परिस्थिती पहावयास मिळाली होती. विविध कारणांमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे राजकारण मात्र ढवळून निघत आहे.