Loksabha Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द आणि कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. या दोन गावांना जोडणारा पूल अठरा वर्षांपूर्वी वाहून गेला होता. मात्र अजूनही नवा पूल बांधलेला नाही. त्यामुळे तातडीने पूल बांधून न दिल्यास मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दिला. या संदर्भात ग्रामपंचायतीत एकमताने ठराव देखील पारित केला आहे.
पूल नसल्याने दोन्ही गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं
कुसुंबा खुर्द या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी यापूर्वीच केलेल्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पाठवली. कुसुंबा खुर्द व कुसुंबा बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल 18 वर्षे बांधून न दिल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.
सन 2006 मध्ये आलेल्या महापुरात पेसा ग्रा.पं. असलेल्या कुसुंबा खुर्द व कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेला. या पुलाची उभारणी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार, आमदार, शासन-प्रशासनाकडे केली. पण या भागातील पुलाकडे दुर्लक्ष केले. कुणीही हा पूल बांधून दिला नाही. त्यामुळे विद्याथ्यीना काटेरी झुडपांमधून व नाल्याच्या घाण पाण्यामधून शाळेत जावे लागते.
हा पूल बांधून द्यावा, यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2023 पासून ग्रामस्थांनी आंदोलन केले. तिरंगा ध्वजाखाली बसून बेमुदत धरणे, रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवाळीपर्यंत या पुलाचा कार्यारंभ आदेश देण्याचे आश्वासन दिलेआंदोलन स्थगित करावी, अशी विनंती केली.दिवाळीपर्यंत पुलाचा कार्यारंभ आदेश पारित केल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल या अटीवर ग्रामस्थांनी आंदोलन. स्थगित केले होते.
त्या अनुषंगाने ६ ऑक्टोबरला . ग्रामसभेत मतदानावर बहिष्काराचा ठराव मंजूर केला होता. दरम्यान, दिवाळीत पुलाचा करीत आदेश न मिळाल्याने गावाने आता निवडणूक बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
वरिष्ठांना कळविले : तहसीलदार
पुलाची प्रलंबित मागणी व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका या अनुषंगाने संबंधितांची बैठक घेत चर्चा केली. त्यांच्या मागण्यां बाबत वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे रावेरचे तहसीलदार बी.ए. कापसे यांनी सांगितले.