Election Commission Of India : लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या एकूण तक्रारींपैकी दहा तक्रारी कोणतेही तथ्य नसल्याने रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हा निर्णय दिला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करण्यासाठी सीव्हिजिल हे हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले होते. याचा वापर करीत अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 47 तक्रारी दाखल झाल्या. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारींसंदर्भात चौकशी केल्यानंतर 30 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. दहा तक्रारींमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे प्रशासनाला आढळले. त्यामुळे या तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत.
कारवाईची मागणी
परवानगी न घेता सभा घेणे, प्रचार रॅलीचे आयोजन करणे, वेळेची मुदत संपल्यानंतरही प्रचार करणे, परवानगीशिवाय पोस्टर किंवा बॅनर उभारणे अशा स्वरूपाच्या या तक्रारी होत्या. सर्वसाधारणपणे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरुद्ध या तक्रारी दाखल केल्याचे आढळले आहे. तक्रार दाखल झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने त्याची चौकशी केली. ज्या तक्रारीमध्ये तथ्य आढळले तेथे निवडणूक विभागाने संबंधितांना नोटीस बजावली.
NMC Election : सीमांकनातील बदल माजी नगरसेवक आणि इच्छुकांसाठी ठरणार डोकेदुखी !
नोटीस बजावल्यानंतर विविध राजकीय पक्षांना उत्तर सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध नियमानुसार कारवाई होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेचा हिशोबही घेण्यात येत आहे. मर्यादेपेक्षा जास्त रक्कम निवडणुकीसाठी खर्च करणाऱ्या उमेदवारांना कायद्याने नोटीस बजावण्यात येणार आहे. खर्च केलेली रक्कम आणि हिशोबात सादर केलेली रक्कम या तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शासकीय कॅमेऱ्यांचा देखील वापर करण्यात आला. या कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. त्यानुसार गरज भासल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आकड्यांची जुळवाजुळव
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून आतापर्यंत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आकड्यांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यानुसार भाजप आणि काँग्रेस विजयाचा दावा करीत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापले उमेदवार एक लाख मतांच्या फरकाने विजयी होतील असा दावा केला आहे.