Lok Sabha Election : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाजाने 100 टक्के मतदानाची शपथ घेतली आहे. मतदान हे पवित्र कार्य म्हणून देश व समाजाच्या हितासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. शंभर टक्के मतदान करणार व करवून घेणार अशी प्रतिज्ञा हात उंचावून केली.
जातिव्यवस्थेचा प्रचंड प्रभाव लोकसभा निवडणूक काळातही दिसून येतो. लोकसभा असो वा स्थानिक निवडणूक, जातीय मतांचे विभाजन अन् गोळाबेरीज यातूनच विजयाची गणिते आखली जातात. त्यावर आधारित निवडणूक रणनीती ठरवली जाते. रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होते. प्रचारातील प्रमुख चेहरे ठरतात. यामध्ये कोणताही पक्ष अपवाद नाही.
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतरही मुस्लिम मतदारांचा कौल कोणाला हे स्पष्ट झालेले आहे. असे असले तरी विजयाची पायाभरणी करू शकणारी ही मते मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी व्यूहरचना आखलेली आहे.
दरम्यान,जळगावच्या महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट अर्थात एमडीएफतर्फे मुस्लीम समाजाची बैठक जळगावातील कोळी पेठेतील मणियार वाड्यात नुकतीच घेण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाने भारताची लोकशाही व संविधानाच्या सुरक्षिततेसाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम रहिवासी भागात प्रत्येक मोहल्ला निहाय बैठका घेतल्या जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने जे आवाहन केलेले आहे, त्याबाबत सुद्धा मतदारांना सामाजिक व धार्मिक उत्तरदायित्व म्हणून जनजागृती केली जात आहे. मणियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चांद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला एमडीएफचे समन्वयक मुफ्ती हारून नदवी, फारुक शेख, आरिफ देशमुख व एमजेपीचे मेहमूद शेख उपस्थित होते.
Lok Sabha Election : महायुती, अपक्ष व आघाडीकडून विजयाचा दावा
दोन टप्प्यात भरभरून झाले मतदान !
राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार’ असा नारा महायुतीकडून दिला गेला. मात्र,मागील काळात तीन तलाक, एनआरसी, मॉब लिंचिंग सारख्या घटना घडल्या. या सर्व घटना मुस्लिम समाज विसरला असे समजून लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून दुर्लक्ष केल्या गेले. मात्र, तसे झाले नाही. अगदी शांततेत आणि नियोजनबद्धरित्या मुस्लिम मतदारांनी आपला रोष मतपेटीतून दाखविल्याचे चित्र आहे. अगदी मतदानाच्या तीन दिवस अगोदर सुप्त लाट मुस्लिम समाजात दिसून आली. त्यातल्या त्यात मतदानाचा दिवस हा शुक्रवारचा आल्याने समाजात संदेश पोहचविण्याचा माध्यम म्हणजे धर्मगुरूंनी दमदार मतदान करण्याचे केलेले आवाहनाने मुस्लिम मतदारांचा टक्का वाढून गेला.