महाराष्ट्र

Lok Sabha Election : पारावरच्या गप्पांना आला उत!

Time Pass : अमका निवडून येईल, तमका निवडून येईल !

Buldhana constituency : दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले. त्यानंतर आता उमेदवारांसह मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांच्या अथक प्रचारानंतर उमेदवारांनी आता विश्रांती घेतली. दरम्यान, मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितस्थळी पोहोचली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्या ठेवण्यात आल्या आहे. 

बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी मतदान झाले. निवडणुकीत 11 लाखावर मतदारांनी मतदान केले. निकाल 4 जून रोजी आहे. मतदानाची टक्केवारी पाहता अनेक उमेदवारांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे. निकालाचा ताण त्यांच्यावर आला असून, प्रतीक्षेचा प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. निकाल लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमधील उत्सुकता ताणली गेली आहे. गावातील चावडीवर, पारावर आता मतदानानंतरच्या गप्पा रंगल्या आहेत. कोण किती मतांनी निवडून येईल याच्या पैजा लागत आहेत. कोणाचा जोर होता, क्रॉस मतदान कोठे झाले, कोणी कोणाचे काम केले, प्रचार कोणाचा भारी होता, अपेक्षांमध्ये कोण सक्षम होते अशा अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

पक्षांची प्रतिष्ठा पणाला

राजकीय स्थित्यंतरानंतर झालेली लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली. यात महायुतीने मोठा गाजावाजा केला तर महाविकास आघाडीने सुद्धा निवडणूक प्रचारात कुठलीच कसर न सोडली नाही. बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. या रणसंग्रामानंतर मतदानाची आकडेमोड सर्वच पक्षांच्या गोटातून होत असल्याने अनेकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सर्वानीच मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती.

बुलढाणा लोकसभेसाठी 26 एप्रिलला 62.03 टक्के मतदान झाले. यात उद्धव सेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर बाजी मारतात की शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहेत. तत्पूर्वी भाजपने विधानसभा मतदारसंघ बूथनिहाय रणनीती केली होती. मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे ग्राह्य धरलेले मतदान आपल्या उमेदवारास झाले की नाही यावर सध्या खल सुरू आहे. कारण निवडणुकीपूर्वी प्राबल्य असलेल्या मतदारसंघासह इतर ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांना बुथनिहाय मतदारांच्या याद्या देण्यात आल्या होत्या.

आता गल्लीबोळांत, बाजारातील पानटपरीवर, पारावर, लग्न समारंभात, आपापसात एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे. ती म्हणजे कोण निवडून येणार? शहरी क्षेत्र असो की ग्रामीण क्षेत्र, सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे जिकडेतिकडे पोहोचले आहेत. त्यात शहरात, परिसर, गावातील गल्ली असो किंवा चावडीवर एकच चर्चा होत आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल? यावर तर्क लावले जात आहे.

Lok Sabha Election : माजी मंत्र्याने लावली 9 लाखांची पैज !

निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या 21 उमेदवारांपैकी प्रमुख उमेदवारांचीच चर्चा गल्लीत बसलेल्या समुहात अधिक रंगत असल्याचे दिसून येते. कोणी कोणी आपल्या पक्षाचे काम केले व कोणी नाही केले. तसेच जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून आपल्या आवडत्या उमेदवाराला लीड मिळेल, कुठे कमी टक्केवारी मिळेल यावरच अनेकांचे मतभेद दिसून येतात. मात्र,अमका निवडून येईल, तमका निवडून येईल, किती मताने उमेदवार निवडून येईल, कोणत्या उमेदवाराची पीछेहाट होईल अशीच चर्चा ऐकायला मिळत आहे. तर गावपातळीवरील नेते व कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत की गुलाल आमचाच. असे असले तरी जूनला मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट होणार असला तरीही आपलाच उमेदवार एवढ्या मताने निवडून येईल याचा दावा केल्या जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!