महाराष्ट्र

Lok Sabha Election : झालं इलेक्शन आता जपा रिलेशन ! 

Be Friendly Now : नरेंद्र खेडेकरांनी गाठले रविकांत तुपकरांचे कार्यालय, घेतली गळाभेट !

Buldhana Constituency : निवडणुकीत अनेक ठिकाणी रक्तातील नातीही एकमेकांविरोधात लढली आहेत. अशामुळे नात्यात कटुता येण्याची शक्यता असते. भाऊबंदकीमध्ये पराभवाचे खापरही फोडले जाते. हे टाळण्यासाठी प्रयत्नही होतो. तशी कृती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी काल एकमेकांची गळा भेट घेत ‘झालं इलेक्शन आता जपा रिलेशन !’ चा संदेश दिला.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रणसंग्राम रंगला आहे. शिवसेनेतील महा बंडाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही लढत वरकरणी उमेदवारामध्ये आहे. मात्र, अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष व वर्चस्वाची लढत आहे. बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्हाच नव्हे तर, ‘मातोश्री’ व ‘वर्षा’पर्यंत उमटणार आहे. यामध्ये काल दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडले.

निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत रंगली होती. यासाठी महायुतीचे खा.प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी प्रचाराच्या मैदानात एकमेकांबाबत तुफान फटकेबाजी केली. अगदी शेवटच्या दिवशी पर्यंत एकमेकांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप- प्रत्यारोप झाले. मात्र निवडणूक संपताच रणांगणात आलेली कटुता कमी करण्याचं प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

काल 27 एप्रिलच्या रात्री आठ वाजता उबाठाचे नरेंद्र खेडेकर यांनी बुलढाण्यातील चिखली रोडवरील रविकांत तुपकर यांचे कार्यालय गाठले. ज्यांनी विरोधात लोकसभा निवडणूक लढवली ते खेडेकर तुपकर यांच्या कार्यालयात जात असताना तुपकर यांचे कार्यालयीन कर्मचारी, परिसरात असलेले तुपकर समर्थक क्षणभर अवाक् झाले. पण, तुपकर यांच्या केबिन मध्ये जाताच दोघांनी कडाडून गळाभेट घेतली..”झालं गेलं पार पडलं..निवडणूक संपली..आता ज्याच जमेल त्यानं लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढायच. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन काम करायचं” असा अलिखित करारच या भेटीत नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यात झाला.

“पाहून घेईल, शिकार करीन..अशा धमक्यांनी गाजलेल्या ,तणावपूर्ण झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील उत्तरार्ध हा नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्या दिलखुलास भेटीने राजकीय परिपक्वतेचे, प्रगल्भतेचे दर्शन घडवणारा ठरला. रविकांत तुपकरांनीही नरेंद्र खेडेकरांच्या दिलखुलास स्वागत केले. गरमागरम चहा घेत घशात मनसोक्त गप्पा रंगल्या.

Lok Sabha Election : 11 लाख 5 हजार 761 मतदारांनी ठरवला खासदार !

“2018 ला जसं राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी थांबलास तसं यंदा माझ्यासाठी थांबला असता तर लढत सोपी झाली असती” असं नरेंद्र खेडेकर यांनी म्हणताच सगळेच खळाळून हसले. त्यावर यंदा लढत गरजेचीच होती असं तुपकर म्हणाले. तुपकर यांनी अपक्ष असताना सुद्धा दिलेली लढत जोरदार अन् दमदार होती. याबद्दल खेडेकर यांनी तुपकर यांचे कौतुक केले. जर मी संसदेत गेलो तर आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढता ते प्रश्न मी संसदेत नक्की उचलून धरीन असा शब्द खेडेकर यांनी तुपकर यांना दिला. शेवटी नरेंद्र खेडेकरांनी आणि तुपकरांनी दाखवलेल्या राजकीय परिपक्वतेची शहरभर चर्चा आणि तेवढेच कौतुक सुद्धा होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!