Local body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत.अशातच उच्च न्यायालयाने तीन महिन्यांत बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. ही निवडणूक 12 मे रोजी होत आहे. या निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीचा पुन्हा एकदा सामना होणार आहे.त्यामुळे लोकसभेनंतर भंडाराकर बाजार समितीचा धमासान बघणार आहेत.
पूर्व विदर्भातील सर्वांत मोठ्या तुमसर, मोहाडी बाजार समितीची ही निवडणूक सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणावर थेट परिणाम करणारी आहे. बाजार समितीची निवडणूक थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यात सरळ लढत माजी आमदार चरण वाघमारे आणि विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्यात होणार आहे.चरण वाघमारे यांना पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करण्याची संधी आहे.
यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी व महायुतीत चांगलीच लढत रंगली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 2 मे या शेवटच्या दिवशी रिंगणात कोण यावरून निवडणुकीची लढत स्पष्ट होणार आहे. बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी ही निवडणूक असून बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच गट सरसावले आहेत.
Onion Issue : महाराष्ट्रात निर्यात बंदी, गुजरातचा कांदा परदेशात
सेवा सहकारी गटात तुमसर तालुक्यात 765 तर मोहाडी तालुक्यात 550 मतदार आहेत. ग्रामपंचायत गटात तुमसर तालुक्यात 97 ग्रामपंचायती असून मतदारांची संख्या 898, तर मोहाडी तालुक्यात 75 ग्रामपंचायतीत 677 मतदार आहेत. अडते व व्यापारी गटात 502, हमाल मापारी गटात 201 मतदारसंख्या आहे.
अपक्ष उमेदवार पॅनेलमध्ये सामावून घेण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. दोन तालुक्यांची निवडणूक असल्याने पॅनेलमधील उमेदवारांपेक्षा अपक्षांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाही. त्यामुळे या निवडणुका पॅनेलद्वारे लढले जातात. आतापर्यंत 142 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आता महाआघाडी, महायुती, विकास फाउंडेशन, किसान गर्जना या निवडणुकीत पॅनेल उभे करणार आहेत.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.