Jail Administration : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सर्वत्र प्रयत्न होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना यंदा ‘व्होट फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असताना विदर्भातील यवतमाळ कारागृहातील कैद्यांनी मतदानावर संपूर्ण बहिष्कार घातला आहे. कारागृहातील कैद्यांनी मतदानावर संपूर्ण बहिष्कार घालण्याची ही पहिलीच घटना आहे. या बहिष्कारमुळे यवतमाळ कारागृहात पाठविण्यात आलेले सर्व बॅलेट पेपर तसेच्या तसे कोरे परत आले आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनेक नागरिक लोकप्रतिनिधींवर नाराज असतात. त्यामुळे गावांनी मतदानावर बहिष्कार घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप कैद्यांनी मतदानावर बहिष्कार घातल्याची घटना घडलेली नव्हती. ही घटना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. कारागृहात कच्चे कैदी व दोषसिद्ध झाल्याने शिक्षा भोगणारे कैदी असतात. या कैद्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत बाहेर सोडले जात नाही. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांसाठी कारागृहातच शिक्षण आदी व्यवस्था केली आहे. अशात कैदी देखील मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी निवडणूक आयोग घेत असते.
अशी असते प्रक्रिया
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कर्तव्यावर असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मतदान बॅलेटवर घेतले जाते. याच पद्धतीने कारागृहांमधील कैद्यांचे मतदान देखील मतपत्रिकेवर नोंदविले जाते. नियमानुसार यवतमाळमध्ये निवडणूक विभागाचे पथक कारागृहात पोहोचले. कारागृहातील कैद्यांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली. मतदानकक्ष उभारण्यात आला. परंतु एकाही कैद्याने मतदान केले नाही. कारागृहातील अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर सर्व कैद्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार असल्याचे जाहीर केले.
कायद्यानुसार कोणालाही मतदान करण्यासाठी बळजबरी करता येत नाही. त्यामुळे ठराविक वेळेपर्यंत यवतमाळच्या कारागृहामध्ये मतदान पथक तैनात होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्वच्या सर्व कोरे बॅलेट पेपर घेऊन मतदान पथक माघारी परतले. यवतमाळ कारागृहातील कैद्यांनी मतदानावर बहिष्कार घातल्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. निवडणूक संदर्भातील नियमानुसार कारागृहात झालेल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे.
Lok Sabha Election : ‘तुमरा पुर्जा निकालना अब हमरे बुते का नहीं दिख राहा..’
कारण अस्पष्ट
यवतमाळ जिल्हा कारागृहातील कैद्यांनी मतदानावर बहिष्कार का टाकला हे अस्पष्ट आहे. सर्वसाधारणपणे गावांमध्ये जेव्हा असे निर्णय घेतले जातात, तेव्हा त्याचे नेतृत्व कोणीतरी करतो. यवतमाळ जिल्हा कारागृहातील मतदानाच्या या बहिष्काराचे नेतृत्व कोणी केले? ही माहिती देखील मिळू शकली नाही. किंवा कैद्यांची नेमकी मागणी काय होती हे देखील कळू शकले नाही. यासंदर्भात ‘द लोकहित’ने यवतमाळ जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.