संपादकीय

Lok Sabha Election : काँग्रेसचा ‘पंजा’ खिशातच; सेनेने गरम केलेल्या तव्यावर शेकली पोळी

Akola Constituency : जनतेसाठी आक्रमक न झालेले नेते पुढे सरसावले

Congress Due to BJP : अकोला लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गरम केलेल्या तव्यावर काँग्रेस आयती पोळी शेकताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. या सत्तेच्या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली. या आघाडीमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जसा ‘सेफ गेम’ खेळला, अगदी तसाच गेम अकोल्यातही काँग्रेस खेळत आहे.

भाजपपासून वेगळे झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंत उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपशी पंगा घेतला. त्यात काँग्रेस फारशी पुढे आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस दुरूनच आपल्या तुतारीचा फुंकणीसारखा वापर करून या आगीला हवा देत राहिली. तसाच प्रकार अकोल्यातही घडला आहे. अकोला जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी, शेतकरी विमा, अवकाळी पाऊस-गारपीट, खचलेला उड्डाणपूल, पाण्याने भरलेला अंडरपास, पूर्णा नदीत वाहून गेलेला पूल आणि महापालिकेतील मालमत्ता कर वसुली अशा जनतेच्या सर्व जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या वाघांनी आंदोलन केले.

केसेस त्यांच्यावर मोठे हे..

अकोला जिल्ह्यात अनेक आक्रमक आंदोलन करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी स्वतःवर पोलिस केसेस लावून घेतल्या. या एकाही आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील एकही नेता दिसला नाही. इतकेच काय तर ज्यांच्यासाठी शिवसैनिक सध्या तळपत्या उन्हात रक्ताचे पाणी करीत आहे, ते काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील देखील अशा कोणत्याही आंदोलनांमध्ये नव्हते. अकोल्यात काही महिन्यांपूर्वीच मोठी दंगल झाली. त्यावेळी दोन्ही शिवसेना, भाजप लोकांच्या मदतीसाठी धावली. पण काँग्रेसला ही दंगल दिसली नाही. त्यावेळी देखील डॉ. अभय पाटील हे नाव चर्चेत नव्हते.

Lok Sabha Election : अकोल्यात लोक मेले तरी चालतील, पण सगळं काही इलेक्शन नंतरच; कारण..

आयता माहोल मिळाला

अकोल्यात सत्ताधाऱ्या विरोधात रान पेटवण्यात. शिवसेनेच्या मशालीने चांगलेच यश मिळवले आहे. त्यामुळे याच मशालीच्या धगधगत्या ज्वाळांवर तवा ठेवून आपली पोळी शेकण्याचा आयता बेत काँग्रेसने तयार केला. आजही शिवसेना आपल्या साहेबांच्या आदेशामुळे काँग्रेससोबत दिवसरात्र एक करत आहे. मात्र काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा, आघाडीचा धर्म पाळण्याचे सौजन्य दाखवले नाही. शिवसेनेकडून अकोला पश्चिमसाठी उमेदवार निश्चित झाला. हे माहिती असतानाही काँग्रेसनेही येथे अधिकृत उमेदवाराचे नाव घोषित करून टाकले.

सुदैवाने या पोटनिवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगता रंगता राहिला. आताही काँग्रेसच्या प्रचारामध्ये शिवसेनेची आघाडी ‘काबिले तारीफ’च आहे. मात्र या परिश्रमाची कदर काँग्रेस करणार का? असा प्रश्न आहे. अकोल्याच्या शिवसैनिकांमध्ये आजही ‘साहेबांच्या’ शब्दाखातर जीवही द्यायला तयार होणारे सच्चे शिवसैनिक आहेत. पण याच शिवसैनिकांची मशाल विझवून प्रसंगी काँग्रेस अकोला पश्चिम विधानसभेच्या निवडणुकीत आपला ‘पंजा’ बळकट करून घेण्याच्या तयारीत आहे. तशी बोलणीही झाली आहे.

ते’ आतापर्यंत होते कुठे?

अत्यंत नि:पक्ष, निष्पक्ष आणि परखडपणे विचार केला तर अकोल्याच्या राजकीय वर्तुळात डॉ. अभय पाटील हे त्यांचे नाव उमेदवारी ‘फायनल’ झाल्यावरच जास्त ऐकू येऊ लागले. गेल्या निवडणुकीत राजीनामा मंजूर न झाल्याने ते निवडणूक लढू शकले नव्हते. राजीनामा मंजूर झाल्यानंतर डॉ. पाटील काँग्रेसमध्ये दाखल झालेत. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पाटील यांना अकोला लोकसभा मतदारसंघासाठी भरीव योगदान देता आले असते. जनतेच्या हक्कासाठी सुरू असलेल्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग त्यांना घेता आला असता. लोकांसाठी, समाजासाठी धावून जाता आले असते. परंतु अकोल्यामध्ये आक्रमक आंदोलनाची मालिका सुरू असताना काँग्रेसचे नेते खिशात ‘पंजा’ घालून निव्वळ गंमत पाहत होते. शिवसेनेच्या एकाही आंदोलनामध्ये काँग्रेसचा सक्रिय सहभाग नव्हता. दुर्दैवाने या नेत्यांच्या यादीमध्ये डॉ. अभय पाटील हे नावही आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डॉ. पाटील यांच्या पदरी जे काही पडेल, ते काँग्रेसची निष्क्रियता आणि शिवसेनेच्या पुण्याई यामुळेच पडेल यात दुमत नाही.

error: Content is protected !!