Congress News : देशातील वातावरण भाजप विरोधी आहे. मोदी सरकार जुमलेबाज असल्याचे लोकांना आता पटलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्रुवीकरणाची भाषा करतात परंतु त्यात तथ्य किती तसेच निवडणूक आयोग नि:ष्पक्ष काम करतो का हा प्रश्न आहे. राहुल गांधींची भूमिका मात्र,सामाजिक न्याय देणारी असते असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपूरला प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांना हात घातला.
भाजपात आले अन् शुद्ध झाले
अजित पवारांची शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू होती. परंतु एरिगेशनच्या 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पक्षात घेऊन शुद्ध करण्याची मोहीम असेल तर माहीत नाही. भ्रष्टाचार करणाऱ्याला सोबत घेऊन सोडणार नाही असं कदाचित पंतप्रधान यांना म्हणायचं असेल. ईडी,सीबीआयच्या नावानं धमकावणे हा भाजपचा धंदा झालेला आहे.
बच्चू कडूंच्या राड्याबाबत
बच्चू कडू यांना अमरावती मध्ये परवानगी नाकारली याविषयी कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक सगळे समान असतात. ज्याने आधी परवानगी मागितली ती बदलण्याचा अधिकार नाही ही तानाशाही आहे. सत्तेची मस्ती असून त्याला साथ देणारे जे अधिकारी आहे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. अशा पद्धतीने वागणं बरोबर नाही.
लोकांना मूर्ख बनवणारी भाषणे थांबवा
जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेले नाही. गरिबांची अवस्था बिकट झालेली आहे. कितीही रणनीती बदलू दे, काँग्रेसवर आरोप करू दे, लोकांनी आता ठरवलेल आहे. हे खोटारडे सरकार आहे. लोकांना मूर्ख समजून सुरू असलेली सत्ताधा-यांची भाषणे थांबवा असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
गडकरींवर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीविषयी
मी विरोधक म्हणून टीका करणार नाही. अनेकदा स्थानिक कार्यकर्ते नियोजन करत असतात. कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू दे लहान मुले येतात त्यांना हौस असते. त्यासाठी उमेदवार जबाबदार आहे असे मी मानत नाही.
Lok Sabha Election : भाजपच्या काळात एकातरी मुस्लिमाला पाकिस्तानात जावे लागले का?
यवतमाळ मधील पुतळा विटंबना
ओबीसी असो मध्यमवर्गीय सर्वांसाठी महात्मा फुले यांनी काम केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य हे मानवतेचे होते. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे आपल्या बापाच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रकार आहे. तो नालायक माणूस असून त्याचा निषेध आम्ही करतो.
पार्थ पवारला सुरक्षा
या देशात सर्वात लोकप्रिय माणूस कोणी असेल तर तो पार्थ पवार. देशात कुठेही गेला तरी लाखोच्या संख्येने गर्दी त्याच्या भोवती होते. अशा नेत्याला वाय प्लस सुरक्षा देणे म्हणजे त्याचा अपमान आहे. त्याला सेंट्रल गव्हर्मेंटचे सुरक्षा कवच देण्याची गरज आहे. इतका महान व्यक्ती तो आहे. कुठलही व्यसन नसलेला, नसलेला निष्कलंक असा हा तरुण आहे. या तरुणाकडे जग आशेने बघत आहे. हा पार्थ पवार उद्या जगाचा नेता होणार आहे. त्याची सुरक्षा करणे हे सरकारचे काम असल्याची मिश्कील टिपणी करत वडेट्टीवार यांनी सरकारला टोला लगावला. तेजस्वी यादव, विशाल पाटील यांच्या विषयी बोलणे त्यांनी टाळले.