Hingoli constituency : हिंगोली लोकसभेचे मतदान दुसऱ्या टप्प्यात आहे. हिंगोली लोकसभेची निवडणूक जरी तिरंगी होत असली तरी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजीराव जाधव यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी लढतोय आणि त्यासाठीच अपक्ष उमेदवारी भरल्याचं शिवाजी जाधव यांनी सांगितल्याचं समोर येत आहे.
शिवाजी जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा झालेला आहे. जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागाचा विकास करण्यासाठी राजकारणातून समाजकारण करण्यासाठी दिल्लीची वकीली सोडून इकडे आलो. सर्वोच्च न्यायालयामध्ये मी 35 वर्ष वकीली केली आणि करतोय. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची माझी नेहमीच भावना असते.
संधी मिळावी म्हणून रिंगणात
गेली दहा वर्ष तरुणांना नोकऱ्या, महाआरोग्य शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, 17 वर्षापासून बंद टोकाई सहकारी साखर कारखाना कर्ज काढून शेतकऱ्यांसाठी सुरू केला. दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, फार थोड्या मतांनी मी पराभूत झालो.
कायद्याचा अभ्यास उपयोगी पडेल
सर्वांचे असे मत आहे की, शिवाजी जाधवची पाटी कोरी आहे. यावेळेस संधी दिली पाहिजे. संसदेमध्ये महत्त्वाचे कायदे पारित केले जात असतात. तिथे माझ्या कायद्याच्या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून इतर उमेदवारांच्या तुलनेत माझी उमेदवारी सरस आहे. म्हणून मला चांगला पाठिंबा मिळतोय, असा विश्वास शिवाजी जाधवांनी व्यक्त केला आहे.