Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना विविध पक्ष समघटनांचा पाठिंबा मिळत आहे.अशातच अमरावतीच्या प्रमुख व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन दिलेल्या पाठिंब्यामुळे बळवंत वानखडे यांचे पारडे जड झालेले मानले जात आहे.
केंद्र सरकारने व्यापारी विरोधी धोरण राबविल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक व्यापाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नोटबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेउन मोदी सरकारने व्यापारी वर्गाची अडवणूक आणि सोबतच कोरोना सारख्या महामारीमध्ये फसवणूक केल्याने व्यापारी नाराज आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडी शिवाय पर्याय नसल्याची भावना व्यापारी वर्गातील प्रमुखांनी बोलून व्यक्त केल्या. मणीरत्नम रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाला यशोमती ठाकूर,सुनील देशमुख, बळवंत वानखडे,प्रीती बंड, विजय भुतडा, राजू पाटील, ऋषी खत्री,विलास इंगोले, बबलू शेखावत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भविष्यातील चुका टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले. यावेळी बळवंत वानखडे यांनी देखील उद्योग व व्यापाराला चालना मिळेल असे धोरण राबविण्यासाठी आपण लोकसभेत पुढाकार घेणार असल्याचे आश्वासित केले.
सुनील देशमुख यांनी म्हटले की,मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गाने बळवंत वानखडे यांच्या पाठीशी उभे राहल्यामुळे व्यापारी वर्गाने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले. अमरावतीतील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ पुढाकार घेतल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. महाविकास आघाडी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास व्यापारी व्यक्त करीत आहेत.