Amravati constituency : ज्या मातोश्रीने संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा संदेश दिला त्याच मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न राणा बाईने केला. मातोश्री बद्दल अपशब्द काढले. त्या राणा बाईचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. राणा बाईच्या पराभवात शिवसेनेचे मोठे योगदान राहील व शिवसैनिकांनी बळवंत वानखडे हाच आपला विचार समजून राणा बाईला पराभूत करा असे आवाहन शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज 18 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला शिवसेनेचे माजी खा. अनंत गुढे, आ. यशोमती ठाकूर, श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, डॉ. सुनील देशमुख,प्रीती बंड, सुधीर सूर्यवंशी,जिल्हा प्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, महानगर प्रमुख पराग गुडधे,प्रदीप बाजड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, किशोर बोरकर, आशिष धर्माळे, मिलिंद चिमोटे, माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले, मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे. भाजपाला शिवसेनेने महाराष्ट्रात मोठे केले. मात्र, त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तोडली. महाराष्ट्र हा कधीच कुणासमोर झुकलेला नाही. परंतु मोदी, शहा यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त पक्ष फोडाफोडी मध्ये 56 इंचाची छाती दाखवतात तिकडे चीनचे सैनिक लडाख मध्ये शिरले परंतु मोदी तोंड उघडत नाहीत. कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका खा. राऊत यांनी केली.
अमरावती विदर्भाची शान आहे. अमरावती सोबतच महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारी नाची महिला बबलीचा (नवनीत राणा) मोठा पराभव करा, असे सांगून खा.राऊत यांनी बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आम्ही लढाई करू, संघर्ष करू पण देश वाचवू, आमची लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचेही खा.संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी देखील राणा दाम्पत्यावर शाब्दिक वार केले. भूखंड माफिया म्हणून राणाची ओळख आहे.धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरो हिरोइन यांना नाचवायचे आणि संस्कृती खराब करायची ही मानसिकता राणा दाम्पत्यांची आहे. घाणेरडे राजकारण करून अमरावती सह महाराष्ट्राची संस्कृती खराब करणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव अटळ असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी म्हटले. यावेळी बळवंत वानखडे,सुनील खराटे, पराग गुडधे, सुधीर सूर्यवंशी,माजी खा. अनंत गुढे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी संजय राऊत यांचा शिवसेनेच्या वतीने मोठा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. टाळ्या व घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले होते. या सभेच्या निमित्ताने उमेदवार बळवंत वानखडे यांना शिवसेनेची भरभक्कम साथ असल्याचे दिसून आले.या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Sanjay Raut : त्यांच्याकडे शेतमालाला नव्हे तर गद्दारांना भाव
सभेला संबोधित करताना हर्षवर्धन देशमुख म्हणाले
हा देश लोकशाहीला मानणारा आहे. याठिकाणी स्वातंत्र्य, बंधुता असताना सध्या गुलामगीरीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. बेरोजगारी वाढली असून अनेकांच्या हाताला काम नाही. उच्चशिक्षण घेणारे तरुण घरी बसलेले आहेत. केंद्र सरकारने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. आज बळवंत वानखडे सारख्या माणसाला निवडून देण्याची नितांत गरज आहे.नाहीतर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही.पंजा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा अशी विनंती देखील राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी केली.