Chandrapur Constituency : चंद्रपूरातून मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे नाही. आमच्या बंगाली बांधवांना कोलकात्याला जाण्यासाठी रेल्वे नाही, हे विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि सुधीर मुनगंटीवार संसदेत गेले की, चंद्रपूरचे यांसह इतरही प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असा विश्वास चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि महायुतीचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज (17) आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉनमध्ये यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या घरची मंडळी सहसा राजकीय कार्यक्रमांना यायला बघत नाहीत. पण आज या व्यासपीठावर सुधीर मुनगंटीवार बोलणार आहेत आणि त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. म्हणून त्यासुद्धा या मेळाव्याला आल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल फार काही बोलण्याची गरज नाही. कारण त्यांचे कामच बोलते. जो माणूस काम करतो, त्याला अधिक बोलण्याची गरज पडत नाही आणि जो कामच करत नाही, त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात, अनेक गोष्टींचा सहारा घ्यावा लागतो, असे म्हणत आमदार जोरगेवार यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराचे नाव न घेता टोला लगावला. चंद्रपूर हा राज्याला ऊर्जा देणारा जिल्हा आहे. हा जिल्हा आता देशात ओळखला जाणार आहे. कारण संसदेत या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व आता सुधीर मुनगंटीवार करणार आहेत, असे आमदार जोरगेवार म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला गेले असतानाचा किस्सा आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, मी राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी काही गोष्टींची माहिती माझ्याकडून घेतली. त्यांनी विचारले की, ‘सुधीरजी कैसे है…? कब आ रहे है दिल्ली..?’ म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींना वाटते की सुधीर मुनगंटीवार यांनी संसद भवनमध्ये यावे. त्यांची ही इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.