Olympics : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत. प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी राजकीय पक्ष सभा आटोपत्या घेत आहेत. दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स आणि भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांनी चंद्रपूरला भेट दिली. या दोऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील क्रीडांगणांची पाहणी केली आणि २०३६च्या ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूर जिल्हा महत्वाची भूमिका बजावणार, असे भाकीत वर्तवले.
चंद्रपुरात येऊन त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण की, एकुणच महाराष्ट्रात तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि ते तिन्ही ट्रॅक चंद्रपुरात आहेत. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिडांगणे आहेत. जेव्हा मी खेळाडू होते, तेव्हा या दर्जाची क्रीडांगणे नव्हती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात पत्रकारांशी संवाद साधताना पी.टी. उषा म्हणाल्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. २०३६ या वर्षात ही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. मोदींच्या प्रयत्नांतून ही स्पर्धा भारतात होईल आणि यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची भूमिका महत्वाची असेल.
ज्येष्ठ भाजप नेते आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दीड वर्षांपूर्वी चंद्रपूरला येण्याचे निमंत्रण दिले होत. पण व्यस्ततेमुळे येता आले नाही. त्यामुळे आता मी चंद्रपूर भेटीवर वेळात वेळ काढून आले आहे, असे सांगताना पी.टी. उषा म्हणाल्या, बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल, चंद्रपूर सैनिक स्कूल, चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल आदी बघून अवाक झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात उभ्या केल्या. याबद्दल त्यांचे केले तेवढे कौतुक थोडे आहे. या तिन्ही ठिकाणी असलेले सिंथेटिक ट्रॅक बघून मनोमन आनंद झाला.
पी.टी. उषा यांनी चंद्रपुरातील खेळाडुंच्याही भेटी घेतल्या. महाराष्ट्रात तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तेही चंद्रपूर जिल्ह्यात आहेत, हे बघून अत्याधिक आनंद झाला. आमच्या काळात जर अशा सुविधा उपलब्ध झाल्या असत्या, तर अधिक उत्तम कामगिरी करता आली असती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि 2036ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होईल. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्याची भूमिका महत्वाची असणार आहे, असे त्या ठामपणे म्हणाल्या. पी.टी. उषा यांच्यासोबत चंद्रपुरात महाराष्ट्र वॉक असोसिएशनचे डॉ. राकेश तिवारी होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे भविष्यात चंद्रपुरातून मोठे खेळाडू घडतील, असे ते म्हणाले.