Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप ‘वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आगामी लोकसभेमध्ये 30 टक्के मत हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मतानुसार मतदान होईल, असा अंदाजही आंबेडकरांनी व्यक्त केला.
दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका, असे मनोज जरांगे यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम मतांमध्ये होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. हा त्यांचा व्हिडीओ बुलढाणा जिल्ह्यातील माध्यमांवर सध्या जोरात व्हायरल होत आहे. प्रकाश आंबेडकर चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले होते कि, मी जर अशा प्रकारचे आरोप केले तर, कल्याणची जागा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडली. पंकजा मुंडे यांच्यासाठीची जागा राष्ट्रवादीने पाच वेळा पराभव झालेला व्यक्तीला दिली.
असे दिले उदाहरण
अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो, याचा विचार केला पाहिजे. मतदारसंघात नवा उमेदवाराचा डावलून पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहात. याचा नेमका अर्थ काय, हे लक्षात घेतले पाहजे. अशा 20 मतदारसंघातील नावे मला सांगता येतील. ज्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदार संघ आहे. जिथे उमेदवारांची ‘फिक्सिंग’ झाली आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना केला होता.
Lok Sabha Election : नाना पटोले हे काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लिपर सेल’
नेमका हाच व्हिडीओ सध्या बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उम्मेदवाराविरोधात माहोल तयार करण्यासाठी समाज माध्यमांवर फिरवल्या जात आहे. बुलढाण्याचे जागा झाली ‘फिक्स’ असा शीर्षक देऊन ही क्लिप व्हायरल होत आहे. राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा फॅक्टर कुणीही लक्षात घेतलेला नाही. मराठा समाजातील गरीब मराठा वर्ग मनोज जरांगे यांना सर्वेसर्वा मानत आहे. माझ्या अंदाजानुसार राज्यातील 30 टक्के मतदान हे जरांगे पाटील यांच्यानुसार मतदान करणार. त्यामुळे त्यांनी आधीच असे घोषित केले आहे की दोन्ही आघाड्यांना मतदान करायचे नाही. परिणामी, यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ होईल, असा अंदाजही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केला होता. त्याचाही व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.