Yavatmal Constituency : शुक्रवारी सकाळी शाळेची घंटी वाजली. मुलांचा किलबिलाट सुरु झाला होता. गुरुजी वर्ग तासिका घेण्यासाठी तयार होत होते. अचानक यवतमाळचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शाळेत प्रवेश केला. हे पाहून गुरुजींची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मंदार पत्की यांनी लागलीच खडू घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली . आपल्याला नवीन दाढीवाले सर शिकवायला आलेत म्हणून विद्यर्थ्यांमध्ये मात्र कुतूहल जागृत झाले. एव्हाना शाळेचा नूर पार बदलून गेला होता.
यवतमाळ जिल्ह्यात कधी काळी जिल्हा परिषद शाळांना (Zilla Parishad School) महत्व होते. त्या शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी गाठली आहे. मात्र, अलीकडच्या काळात शाळांच्या विविध समस्यांमुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शाळांच्या वर्गखोल्या अगदी जुन्या झाल्या आहेत. पावसाळ्यात छतातून पाणी गळते. छतांच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पण पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. अलीकडच्या काळात शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालली आहे. शाळांमधील बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. उपलब्ध शिक्षकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहण्यावाचून त्यांना पर्यायच नाही. शाळेतील बहुतांश शिक्षक आणि कर्मचारी हे मुख्यालयावरून येणेजाणे करतात. ते वेळेवर पोहचून शिकवतील हे तर केवळ दिवास्वप्नच म्हणावे लागते. याशिवाय परिसरातील अस्वच्छता ही रोगराईला आमंत्रण देत असते.
दोन हजार शाळा
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. यातील बहुतांश शाळा या ग्रामीण आणि अति दुर्गम भागात आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून शासनामार्फत अनेक उपाय योजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सावरगड माध्यमिक जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. सोबतच शाळेची संपूर्ण तपासणी केली. तसेच उपस्थित शिक्षकांना देखील मार्गदर्शन केले.
आताशा विद्यार्थी आणि पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडे जास्त आहे. याचे कारणही तसेच आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील शाळांची इमारत व वर्ग खोल्यांची दुरूस्ती तसेच स्वच्छतागृहांची दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाचनालय, क्रीडांगणाची सुविधा,आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट-वायफाय सुविधा निर्माण करणे इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्या व्यतिरिक्त शिक्षकांचे शाळाबाह्य काम कमी करणे, त्यांचे शैक्षणिक मूल्यांकन करून त्यांना गुणवत्ता वाढीकरिता शिक्षण देण्याची सुद्धा गरज आहे. तरच जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांचा कल हा जिल्हा परिषद शाळांकडे पुन्हा वाढेल यात शंका नाही.