Highest Candidate : सुमारे 53 वर्षांच्या कालखंडानंतर पश्चिम विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लवकरच होत असलेल्या निवडणुकीत तब्बल 37 उमेदवार आपले भाग्य आजमाविणार आहेत. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
1971 मध्ये तयार झालेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून आतापर्यंतची ही दुसरी वेळ आहे जेव्हा सर्वाधिक संख्येत उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी 1996 मध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येत असताना एकूण 38 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यावेळी ईव्हीएमवर मतदान घेतले जात असताना 37 उमेदवार रणांगणात आहेत.
Lok Sabha Election : अमरावतीत उमेदवारांच्या इमेजवर ठरणार मतदानाचा कौल
एकाच वेळी 37 उमेदवार निवडणूक लढवित असल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर तीन ईव्हीएम युनिट ठेवावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली. चिन्ह वाटपाअंती आता अमरावतीच्या प्रशासकीय यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर ईव्हीएमची गरज भासणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. एकूण सहा मतदारसंघात अडीच हजारावर मतदान केंद्र आहेत. त्यामुळे साधारणपणे साडेतीन हजारावर ईव्हीएम या मतदारसंघाला लागण्याची शक्यता होती. आता ही संख्या आठ हजाराच्या आसपास जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अतिरिक्त यंत्रांची मागणी
अमरावती जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच अतिरिक्त बॅलेट युनिटची व्यवस्था केली आह. एका बॅलेट युनिट वर 16 उमेदवारांची नावे राहणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून 37 उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत मात्र भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश बूब व वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले आनंदराज आंबेडकर यांच्यातच होणार असल्याचे मानले जात आहे.
मतदान केंद्रांची संख्या
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांचा विचार केल्यास धामणगाव रेल्वे : 378, बडनेरा : 337, अमरावती : 314, तिवसा : 319, दर्यापूर : 316, मेळघाट : 354, अचलपूर : 309, मोर्शी : 311 मतदारसंघ कार्यरत आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 638 आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन ईव्हीएमचा विचार केल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघाला एकूण 7 हजार 914 ईव्हीएम लागतील असे सांगितले जात आहे.