Political war : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गृहक्षेत्र असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले आहे. या निवडणुकीत हे दोघेही निवडणूक रिंगणात नसले, तरी ही निवडणूक त्यांच्याच भोवती केंद्रित असून, दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांची मदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पटोले हे नेहमीप्रमाणे भावनिक कार्ड खेळणार, याची चर्चा मतदारसंघात होऊ लागली आहे.
Bhandara ZP : सुटीतही जिल्हा परिषद ऑन ड्यूटी, टेंशन मार्च एंडिंगचे !
लवकरच फैसला
पूर्व विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. जाहीर प्रचारासाठी आता 7 दिवस शिल्लक असल्याने स्टार नेत्यांच्या प्रचारसभांनी प्रचारात रंगत आणली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आतापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा झाली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा होणार आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत, तर उद्या 13 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे.
दुसरीकडे या मतदारसंघात नेहमीच जातीय समीकरण हे महत्त्वपूर्ण राहिले आहे. कुणबी आणि पोवार समाजाच्या मतांची संख्या अधिक असल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्ष उमेदवार देताना कुणबी किंवा पोवार समाजाचा उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात, तर या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने सुद्धा कुणबी उमेदवार दिला आहे. त्यामुळे मतांचे विभाजन दोन्ही उमेदवारांमध्ये होणे निश्चित आहे. भाजपकडून मोदींच्या नावावर प्रचार केला जात आहे, तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून भावनिक कार्ड खेळले जात आहे. या कार्डवर विजयाचे गणित जुळविले जात असून, कोणते कार्ड प्रभावी ठरणार, हे निवडणूक निकालानंतर कळेलच.त्यामुळे भंडारा- गोंदिया मतदारसंघात मोदी कार्ड वर्सेस भावनिक कार्ड? सरळ लढत असल्याचे बोलले जात आहे.