महाराष्ट्र

Lok Sabha Election : साकोलीच्या जैनबींचे राज्यात पहिले ‘व्होट फ्रॉम होम’

Bhandara-Gondia Constituency : अंथरूणाला खिळल्यामुळे गेली अनेक वर्ष घरीच

Vote From Home : केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात पहिले ‘व्होट फ्रॉम होम’ करण्याची संधी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील 98 वर्षीय जैनबी कुरेशी यांना मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंथरूणाला खिळलेल्या जैनबी साकोली येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचे गृहमतदान घेण्यात आले. त्या राज्यातील पहिल्या गृहमतदार ठरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आजारपणामुळे जैनबी यांनी मतदानच केले नव्हते.

घरबसल्या मतदान करता आल्यामुळे जैनबी यांचा मुलगा कलीम जब्बार कुरेशी यांनी आनंद व्यक्त केला. जैनब्बी यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले. केंद्रीय निवडणूक आयोगाने घरबसल्या मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये मतदार अधिकारी, कर्मचारी सध्या फिरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेत निवडणूक अधिकारी मतदान करून घेत आहेत. त्यातूनच जैनबी यांनी राज्यातील पहिले ‘व्होट फ्रॉम होम’ केले.

Lok Sabha Election : धावपट्टीच नसल्याने मनसेचे ‘इंजिन’कुठपर्यंत ओढणार राणांची गाडी?

दोन मुले आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचा मुलगा कलीम जब्बार कुरेशी हे मतदान प्रक्रियेच्यावेळी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया गोपनीयतेने पार पाडण्यात आली. कोणालाही मतदान कक्षात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. इतकेच काय तर मतदान करताना गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने फोटो काढण्यासही मतदान पथकाने मनाई केली होती. जैनबी यांच्या ओळखीची खात्री पटविण्यात आली. त्यासाठी मतदार यादीतून त्यांचा तपशिल व ओळखीच्या पुराव्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर नियमानुसार मतदान करून घेण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 85 वर्ष व त्यावरील मतदारासाठी घर बसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेत मतदान चमू परिसर पालथा घालत आहेत. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातही मतदान पथक जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!