PM Narendra Modi Sabha: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून भाजपकडून स्टार प्रचारकांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे आज प्रचार सभा झाली. मात्र, या सभेत काळ्या कपड्यात आलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला तर अनेकांना पाण्याच्या बॉटल, डबा, बॅग नेण्यास मनाई करण्यात आली. अनेकांनी घातलेले काळ्या रंगाच्या टी शर्ट, टोपी आणि सॉक्स काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आला. विरोध आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे आदेश जारी करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार वेग धरला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल पार पडणार आहे. पूर्व विदर्भातील मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळेच उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा झाल्यानंतर आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे नागपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती.
तीनही मतदारसंघातून मोठी गर्दी या सभेसाठी झाली होती. नागपूर ग्रामीण पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार सभास्थळी पाण्याच्या बॉटल, डबा, बॅग नेण्यास मनाई करण्यात आली. काळ्या कपड्यात कुणी आढळला तर त्याला सभास्थळी प्रवेश नाकारण्यात आला. मैदानात प्रवेश करायचा असल्यास काळे कपडे काढण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी घातलेल्या काळ्या रंगाच्या टी शर्ट, टोपी आणि सॉक्स काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पोलिस तपास पथकाजवळ काळ्या कपड्यांचा खच लागला होता. या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.