Bhandara Gondia constituency : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताबाबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली. तसेच विरोधकांना संपवून निवडणूक जिंकायची आहे का, त्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोंढे यांना महाराष्ट्राची संस्कृती नीट समजली नाही. महाराष्ट्र संस्कारमय आहे. असे घातपात महाराष्ट्रात कोणी करत नाही. आमचे सरकार आणि आम्ही अशा विचाराचे मुळीच नाही.
नानांना उदंड आयुष्य लाभो,अशी आई जगदंबेला प्रार्थना करतो. परंतु अशा घटनांचा आधार घेऊन जे राजकारण करतात ते चुकीचे आहे. अशा प्रकारची टीका करू नये. विरोधक असो वा छोटा कार्यकर्ता कोणाचाही अपघात होऊ नये. प्रत्येकाने एकमेकाची काळजी घेतली पाहिजे असे बावनकुळे म्हणाले.
Nana Patole : नानांची तक्रार, घातपाताची चौकशी पोलिसांनी करावी !
मनसेच्या पाठिंब्याबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेचे अभिनंदन करतो असे सांगून बावनकुळे म्हणाले, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिशा दिली. महायुती अजून मजबूत होईल. त्यांची भूमिका निर्णायक ठरेल. देशाचे पंतप्रधान मोदी व्हावे म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा निर्णय ते घेतील.
एकीकडे उद्धव ठाकरे सारखे नेते हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले. उदयनिधी स्टॅलिनला साथ देत आहे. मात्र, राज ठाकरे हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी कधी आग्रह धरला नाही. आणि कमळावर लढा असे आम्ही कधीच त्यांना म्हणणार नाही.
पंतप्रधान मोदींची सभा पूर्व विदर्भात मोठे परिवर्तन करेल. पाचही जागांवर मोठा फायदा होईल. आजची सभा ऐतिहासिक राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या विचाराला मूठमाती
उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून काँग्रेसला साथ दिली. त्यांनी शिवसेनेच्या विचाराला मूठमाती दिली. स्वतःच्या कार्यकर्त्यांशी बेईमानी केली.
उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधी आहेत. उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी,शरद पवार यांच्याकडे जावे लागत आहे.यापेक्षा अधिक दुर्दैव काय असू शकते.
नवनीत राणा बहुमताने जिंकतील
राणा यांच्या बाबतीत आपण मिश्किलपणे बोललो. त्याही मिश्किलपणे बोलल्या होत्या. नवनीत राणा या प्रचंड बहुमताने जिंकतील याविषयी शंका नाही असे बावनकुळे म्हणाले.