Nagpur Constituency : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंवाद यात्रेत आपुलकीचे दर्शन घडले. बुधवारी सकाळी मध्य नागपुरातील फुटाळा परिसरातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन गडकरींच्या यात्रेला सुरुवात झाली. मतदारांशी संवाद साधत गडकरींची ही लोकसंवाद यात्रा हळूहळू पुढे सरकू लागली. अनेक ठिकाणी महिलांनी गडकरींना ओवाळले. मार्गात रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच यात्रेवर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या लोकांनी पुष्पवृष्टी केली.
उपस्थिताना संबोधित करताना गडकरींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. विकासावर त्यांनी भर दिला तसेच विरोधकांवर कुठलीही टीका केली नाही.
यात्रेमध्ये भाजयुमोचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रचार रथासोबत निघालेल्या बाईक रॅलीने वातावरण निर्मिती केली. ‘नितीन गडकरी आगे बढो हम तुम्हारे साथ है, ‘कहो दिल से नितीनजी फिर से, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यात्रेच्या मार्गावर स्वागतासाठी प्रत्येक मार्गावर प्रचंड उत्साहात रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे होेते. महिलांनी औक्षण करून नितीन गडकरी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रचार रथावर प्रत्येक वस्तीत नागरिकांकडून पुष्पवर्षाव होत होता. संपूर्ण यात्रेत विविध समाजाच्या, धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वागत केले.
नागरिकांनी उत्साहाने रॅलीत सहभाग घेत नितीन गडकरी यांचे स्वागत केले. काहींनी पुष्पवर्षाव करून तर काहींनी पुष्पहार घालून गडकरी यांचे स्वागत करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. लोकसंवाद यात्रेसाठी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. महिलांनी घरापुढे सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आतिषबाजी केली. तर काही वस्त्यांमध्ये स्वागताचे फलक लावण्यात आले होते.