Political News : बुलढाणा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. अर्ज छाननीच्या दिवशी 25 उमेदवार रिंगणात असले तरी यातील अनेकांचे बंड थंड होणार आहे. त्यामुळे काही अर्ज माघारी होतील. बुलढाणा जिल्ह्यात प्रमुख लढतींमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि संदीप शेळके अशी चौरंगी लढत होणार आहे. आतापर्यंतच्या चौघांच्याही रॅली आणि मेळाव्यांमध्ये मोठी गर्दी राहत असल्याने एव्हडी माणसे आली कुठून? आलीत की आणल्या गेली? याबाबत आता चर्चा रंगू लागली आहेत.
बुलढाणा मतदारसंघातून 25 उमेदवारांचे नामांकनपत्र वैध ठरले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी काढलेल्या रॅलीत मात्र तोबा गर्दी दिसून आली. त्यामुळे उमेदवारांना हायसे वाटले असले तरी तेही काहीकाळ बुचकळ्यात पडले असतील. कारण सर्वच उमेदवारांनी जोरदार गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे ही गर्दी जमली की जमवली? याचीही चर्चा आता होऊ लागली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सध्यातरी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी प्रचाराचा शुभारंभ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथून 5 एप्रिल रोजी केला. प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध ही लढाईची सुरुवात असून याला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांनी मोजक्याच पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शन वैगरे टाळले. ते खरेच अर्ज भरतात की नाही, याबाबतच शंकाकुशंका निर्माण केल्या जात होत्या. मध्यंतरी त्यांचा फोनही लागत नसल्याने ते फोन ‘स्वीचऑफ’ करून का बसलेत ? याबाबतही सोशल मीडियांवर शंकांचा पूर आल्याचे दिसून आले होते. परंतु अर्ज दाखल करून त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जोरात प्रचार
बुलढाणा लोकसभेसाठी नामंकन पत्र भरण्याची प्रक्रिया आता संपली आहे. छाननीअंती 25 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यातील काहींचे अर्ज आज माघारी होणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी प्रमुख उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महायुतीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर, अपक्ष उम्मेदवार रविकांत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, या सर्व शक्ती प्रदर्शनात तोबा गर्दीही उसळली होती. त्यामुळे सर्वांनाच हायसे वाटले तरी काहीकाळ उमेदवार बुचकळ्यात देखील पडले. चौघांनीही गर्दी जमवण्यासाठी गाड्या, जेवणाचे पाकीट व बिसलरी पाण्याची चोख व्यवस्था केली होती.
वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांच्याकडेही गर्दी दिसली. 4 एप्रिल रोजी महाआघाडीचे शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचाही अर्ज दाखल करतेवेळी चांगलीच गर्दी झाल्याचे दिसले. यावेळी प्रामुख्याने शिवसेना युवानेते आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सभा चांगलीच गाजवली. सर्वच प्रमुख उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाला चांगली गर्दी दिसून आल्याने हायसे वाटले.
इकडची गर्दी तिकडे
प्रतापराव जाधव यांच्या रॅलीतील लोक जेवणाची पाकिटे घेऊन रविकांत तुपकर यांच्या रॅलीत सामील झाल्याचे किस्सेही चवीने चघळले जात आहेत. तुपकर यांनी शेतकर्यांच्या भरवशावर निवडणूक लढविण्याचे ठरवल्याने गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी जय्यत तयारी सुरू केली. जवळपास जिल्ह्यातील बरेच गावात त्यांची पहिली फेरीही झालेली आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांनीही सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचे सांगितले जाते. निवडणूक लागण्यापूर्वीच शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे व नेते खासदार संजय राऊत यांच्या जिल्ह्यात पाच सभा झाल्या. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनीही यात्रा काढली होती. खासदार जाधवांनीही महायुतीचे मेळावे व भेटीगाठी सुरू केल्या असल्या तरी मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप झाल्या नाहीत. त्या नियोजित असल्याचे सांगितले जात आहे.