Akola Constituency : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधाला झुगारून भाजपकडून अमरावती येथे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे बच्चू कडू यांनीही भाजपच्या विरोधात उमेदवार देऊन उत्तर दिलं आहे. आता अमरावती सह इतर ठिकाणी ताकद असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहारकडून भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे. अकोल्यात आज प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने बच्चू कडू यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. याचा भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रामटेक मध्येही प्रहारकडून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे.
Lok Sabha Election : राणांना तिकिट देताच बच्चू कडूंचा ‘प्रहार’
प्रहारच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला फायदा!
महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू हे अकोल्याचे दीड वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी अकोल्यात प्रहार वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. 2019 च्या निवडणुकीत अकोट विधानसभेत प्रहारच्या स्व. तुषार पुंडकर यांना 25 हजार तर मूर्तिजापूर विधानसभेत नाचणे यांनी 10 हजार मते घेतली होती. अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्यही होता. आता ते वंचित मध्ये गेले. तर अकोट पंचायत समितीतही एक सदस्य आहे. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडूंना मानणारा चाहता वर्ग आहे. गेल्या विधानसभेवेळी प्रहारच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान लक्षात घेतलं तर लोकसभेला बच्चू कडू हे भाजपच्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतील अशी शक्यता आहे.
कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन दिला पाठिंबा!
प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी आज अकोल्यात प्रहार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा द्यायचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसा ठराव ते अध्यक्ष बच्चू यांना पाठवणार आहेत. दरम्यान त्यांनी भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या विरोधात नाराजी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.