महाराष्ट्र

Lok Sabha Election : निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदी येथे घेणार सभा

Chandrapur Constituency : सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मागणार कौल

BJP Politics : विदर्भात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अशात चंद्रपूर- वणी-आर्णीच्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी व राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी कौल मागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार (ता. 08) सभा घेणार आहेत. चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी सायंकाळी चार वाजता ही सभा होईल. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये सध्या सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्काचा धडाका सुरू आहे. विकास कामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात आल्यामुळे त्यांना पाठिंबाही मिळत आहे. मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना नरेंद्र मोदी यांची सभा होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. सध्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

प्रगतीचे दशक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत ‘प्रगती दशक’चा अनुभव करीत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.. गेल्या दहा वर्षात कृषी, विज्ञान, अंतराळ, शिक्षण, आरोग्य, सुविधा अशा प्रत्येकच क्षेत्रात देशाने आघाडी घेतली आहे. अनेकविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य नागरिक, महिला आणि इतर गोरगरिबांचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने यशस्वीपणे केला. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची प्रगती साधताना एक नवा आदर्श भारतीयांपुढे निर्माण केल्याचे भाजपने यानिमित्ताने नमूदक केले.

नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची जाहीरपणे प्रशंसा केली आहे. यात 2 कोटी वृक्ष लागवड, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी गाजविलेले मिशन शोर्य, ताडोबा-अंधारीमध्ये आभासी भिंतीचा प्रयोग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे मोदींनी ‘मन की बात’मध्ये कौतुक केले आहे. आता तेच मोदी मुनगंटीवार यांच्यासाठी चंद्रपुरात येत आहेत.

केंद्राचा भरीव निधी

गेल्या 10 वर्षांत चंद्रपूर लोकसभेसाठी केंद्र सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. बल्लारपूर ते तेलंगाना राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चामोर्शी गावात सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू केला आहे. आष्टी गावाजवळ वैनगंगा नदीवर पूल बांधला गेला आहे. वर्धा नदीवरील पुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. माणिकगड रेल्वे स्थानक आणि भद्रावती तालुक्यातील नंदुरी रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. वरोरा तालुक्यातील नागरी आणि चिकनी रेल्वे स्थानकांचे उद्घाटन आणि चंद्रपूर येथील ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांना मदत

प्रधानमंत्री कृषी सम्मान निधि योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार 536 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 355 महिलांना मोफत गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 42 हजार 744 शेतकऱ्यांना विमा देण्यात आल्याचे भाजपने स्पष्ट केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!