Buldhana Protest : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती साठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. अशातच बुलडाणा लोकसभा मतदार संघातील तीन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव, खडकी, खैरखेड अशी ही तीन गावे आहेत.
विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्याने यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ग्रामस्थांनी ठरवले. तिन्ही गावात ठिकठिकाणी “मतदानावर बहिष्कार”! अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. तसेच यामध्ये वन जमिनीवरील अतिक्रमण काढणे, स्थानिक नागरिक नसताना मतदार यादीत अतिक्रमण धारकांचा समावेश करणे अशी कारणे नमूद करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. या तिन्ही गावातील रहिवासीयांनी एकत्र येत ‘मागण्या मान्य नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका घेतली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे.
या गावांचाही रस्त्यासाठी बहिष्कार !
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शेगाव तालुक्यातील एकफळ येथील गावकऱ्यांनीही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्रशासनाला लेखी स्वरूपात दिलेला आहे. एकफळ ते आळसणा या 2 किलोमीटर चा रस्ता मागील वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहे यामुळे येथील गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेगावात जाताना तारेवरची कसरत करावी लागते. येथील गावकऱ्यांनी रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने केलीत मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही त्यामुळे येथील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्रशासनाला लेखी स्वरूपात दिलेला आहे.