महाराष्ट्र

Lok Sabha Election : वाढदिवशी राणा पुन्हा हनुमंताला शरण, 501 जोडप्यांसोबत हवन

Amravati Constituency : राजकीय संकट दूर सारण्यासाठी केली प्रार्थना

Amravati Constituency : राज्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी राहणारा अमरावती जिल्ह्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त हनुमान गढी येथे जाऊन 501 जोडप्यांसोबत होम हवन केले.

राजकीय संकट दूर होण्यासाठी त्यांनी संकट मोचन हनुमानजींना साखळ घालत प्रार्थना केल्याने राणाच्या नव्या राजकीय शैली विषयी जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दांपत्याने उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा चंग बांधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी होते त्यावेळी अटातटीच्या काळात नवनीत राणा यांचा आग्रह पूर्ण झाला नाही.

मात्र, त्यांना देशद्रोहाच्या कलमासह 14 दिवस तुरुंगात जावे लागले. त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या राजकारणाचा रंगच बदलला. कधीकाळी सर्व समावेशक विचार धारा घेऊन चालणाऱ्या नवनीत राणा अचानक आपल्या नावासमोर ‘हिंदू शेरनी’ असं बिरूद मिरवू लागल्या. तर आमदार रवी राणा यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालीसा वाजवण्यासाठी भोंग्यांचे वितरण करू असेही सांगितले. यावेळी राणा दांपत्यांनी जिल्ह्यातील अनेक मंदिरांना भोंगे आणि ऍम्प्लिफायर यांचे वितरण सुद्धा केले.

Lok Sabha Election : प्रचंड विरोधानंतरही राणांना उमेदवारी देत भाजपचे धाडस

या काळात राणा दांपत्य अनेक ठिकाणी ट्रोल सुद्धा झाले. कारण एका खाजगी वाहिनीवर मुलाखत देत असताना त्यांना हनुमानाची पूर्ण माहितीच नसल्याने ऑन कॅमेरा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांचं बोट धरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चा अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा मिळवला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात त्यांनी सरकारसोबत जात सरकारच्या विविध योजना व धोरणांना खुल्या मनाने समर्थन केले त्यासाठी केलेले अनेक भाषणे सुद्धा चांगलीच गाजली होती.

आता नवनीत राणा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. जात प्रमाणपत्राचा निकाल व भाजपमध्ये प्रवेश असा दुहेरी तारेवरचा कसरत सादर त्यांनी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त आज त्यांनी सकाळी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात जाऊन ध्वजारोहण केले आणि त्यानंतर राणा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीला चारसो पार चा आकडा गाठता यावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पुन्हा हनुमान चालीसा आधार घेतला. आज छत्री तलाव परिसरातील हनुमान गडी येथे युवा स्वाभिमान च्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस होम हवन करून साजरा करण्यात आला. यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, डॉ. वसुधा भोंडे, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, उद्योजक लाप्पी सेठ जाजोदिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त नवनीत राणांनी केलेले होमहवन व संकट मोचन हनुमान यांना घातलेलं साकडं किती फलश्रूत ठरतं हे येणाऱ्या लोकसभेच्या निकालातूनच कळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!