Unique Resolution : बुलढाणा लोकसभा निवडणुकीत जो पर्यंत शेतकरी नेते रविकांत तुपकर निवडून येत नाही. तोपर्यंत चप्पल घालणार नाही,’ असा अनोखा संकल्प तुपकरांच्या एका कार्यकर्त्याने केला आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या कार्यकर्त्याची खांद्याची नस दबल्याने, इलाज घेऊनही त्याचा उजवा हात ३ वर्षांपासून निकामी आहे. त्यावर इलाज करणे गरजेचे आहे. मात्र जो पर्यंत तुपकरांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवित नाही तो पर्यंत हातावर इलाज करणार नाही असा संकल्प करीत रात्रंदिवस प्रचारात हा पठ्ठा भिडला आहे. सर्वच कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जीवाचे रान करतातच. मात्र रविकांत तुपकरांच्या या जिद्दबाज कार्यकर्त्यांचा प्रचार अफलातून असाच म्हणावा लागेल.
हे जिगरबाज कार्यकर्ते एकाच गावचे आहेत. त्यातील राम वसंतराव देवरे याने मागील एक दीड महिन्यापासून पायात चप्पल घालणं सोडलं आहे. सध्या सूर्य आग ओकू लागला आणि सिंदखेडराजा तालुक्यातील तापमान ४२ डिग्रीच्या आसपास आहे. जमीनपण तापली आहे. या भीषण तापमानातही ह्यो गडी बिना चप्पल, गावोगावी फिरत आहे. रविभाऊ लोकसभा जिंकले, खासदार झाले, गुलाल अंगावर घेतल्यावरच पायात चप्पल घालेल. असा राम भाऊचा असा अनोखा निर्धार अन अनोखे ‘अनवाणी व्रत! सोबतीला संदीप देवरे, अनिल देवरे आणि गजानन डिघोळे हे जिवाभावाचे सवंगडी. सगळे काळ्या आईची सेवा करून पिकं घेणारे युवा शेतकरी. मात्र तुपकरांची रथ यात्रा सुरू झाल्यापासून ते २६ एप्रिलला होणाऱ्या मतदान पर्यंत त्यांनी’ सुट्टी’ घेतली आहे.
आमच्यासाठी, जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करणारा आमचा नेता रविकांत तुपकर लोकसभा लढतोय. मग त्यासाठी तर एवढं करावंच लागेल अशी या चमुची भूमिका आहे. डीघोळे यांची कार, सर्वांनी मिळून त्यात इंधन टाकायचे आणि सकाळी सहाला प्रचाराला भिडायचं अशी त्यांची स्टाईल. सोबतीला घरच्या शिदोऱ्या, नाहीतर कोणत्याबी पाव्हन्याच्या घरी दोन घास खायचे अन पुढच्या गावाला सुटायचं. राम ला तर पायाला आलेल्या फोडाची, वेदनांची बी काळजी नाही!
गजानन डिघोळे लय भारी!
अल्टो कारचा चालक मालक म्हणजे गजानन डीघोळे म्हणजे लय भारी! या पठ्याची खांद्याची नस दबल्याने, इलाज घेऊनही त्याचा उजवा हात ३ वर्षांपासून निकामी आहे. त्यावर इलाज करणे गरजेचे आहे. मात्र जो पर्यंत तुपकरांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवीत नाही तो पर्यंत हातावर इलाज करणार नाही असा संकल्प करीत रात्रंदिवस प्रचारात हा पठ्ठा भिडला आहे. मात्र हा पठ्ठा एका हाताने मारुती अल्टो कार चालवितो. दररोज बारा तेरा तास प्रचार केल्यावर ही टीम माहेरखेड ला रात्री बेरात्री परत येते अन पहाटे दिस उजाळला की पुन्हा नव्या दमाने प्रचाराला भिडते.