Buldhana News : शेवटच्या टप्प्यात आपण आपला उम्मेदवारी अर्ज माघारी घेऊ असे म्हणणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना आता माघार घ्या अशी विनंती खासदार प्रतापराव जाधव यांना करावी लागणार नाही. संजय गायकवाड यांचा अर्ज बाद झाला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काल छाननीत एकूण पाच अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांचा समावेश आहे.
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षाच्यावतीने अर्ज भरला होता. त्याच दिवशी संध्याकाळी खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. दुसऱ्या दिवशी बुलढाण्यात झालेल्या मेळाव्यात अर्ज माघार घेण्याचे संकेतही आमदार गायकवाड यांनी दिले होते. मात्र आमदार गायकवाड यांना आता माघार घेण्याची गरजच उरली नाही. त्यांचा अर्ज शुक्रवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म संजय गायकवाड यांना फॉर्म सोबत जोडता आला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. आमदार गायकवाड यांच्या व्यतिरिक्त आणखी तीनउमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपच्या वतीने भरलेला अर्ज रद्द झाला. मात्र त्यांनी अपक्ष भरलेला अर्ज कायम आहे. त्या व्यतिरिक्त श्याम बन्सीलाल शर्मा, ॲड. सैय्यद मुबीन अपक्ष उमेदवार यांच्या अर्जावर दहा सूचकांच्या सह्या अपेक्षित असताना केवळ सहा सूचकांच्या सह्या होत्या. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. बसपाने गौतम किसनराव मघाडे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर पर्यायी उमेदवार म्हणून विलास शंकरराव तायडे यांचे नाव होते. मात्र मुख्य उमेदवार गौतम माघाडे यांचा अर्ज पात्र ठरल्याने पर्यायी उमेदवार विलास तायडे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता रिंगणात 24 अर्ज उरले आहेत. 8 एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे रिंगणात कोण कोण असेल याचे चित्र त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असल्याने 25 उमेदवार अद्यापही कायम आहेत. सोमवार, 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी 29 उमेदवारांनी 42 नामांकन अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.
संजय रामभाऊ गायकवाड : शिवसेना, विजयराज हरिभाऊ शिंदे :भाजप, श्याम बन्सीलाल शर्मा : अपक्ष, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम : अपक्ष, विलास शंकर तायडे : बहुजन समाज पार्टी या पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पात्र अपात्र ठरले. यापैकी विजयराज शिंदे यांचा अपक्ष म्हणून असलेला अर्ज पात्र ठरल्याने एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र पात्र ठरले आहेत.
यांचे अर्ज ठरलेत पात्र
विजयराज हरिभाऊ शिंदे : अपक्ष, प्रतापराव गणपतराव जाधव : शिवसेना, रेखा कैलास पोफळकर : अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील : बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तूपकर : अपक्ष, असलम शहा हसन शहा : महाराष्ट्र विकास आघाडी, महंमद हसन इनामदार : मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सुमन मधुकर तिरपुडे : पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, नंदू जगन्नाथ लवंगे : अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे : अपक्ष, संदीप रामराव शेळके : अपक्ष, गजानन जर्नादन धांडे : अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर : शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, मच्छिंद्र शेषराव मघाडे : सोशालिस्ट पार्टी इंडिया, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील : अपक्ष, दिपक भानुदास जाधव : पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, अशोक वामन हिवाळे : अपक्ष, नामदेव दगडू राठोड : अपक्ष, वसंत राजाराम मगर : वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे : भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे : अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे : अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे : बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, गौतम किसनराव मघाडे : बसपा या उमेदवारांचे नामांकन अर्ज पात्र ठरले आहेत.