महाराष्ट्र

Lok Sabha Election : आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर ओढले ताशेरे! 

Buldhana Constituency : प्रा. नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल 

Aditya Thackeray : महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीचे सर्व नेते हजर होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीनवाजेपर्यंतची डेडलाईन होती. त्यामुळे सकाळीच खेडेकर यांनी अर्ज दाखल करत, त्यानंतर रॅली व जाहीरसभा घेतली. या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गद्दाराला गाडण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे प्रा. खेडेकरांनी नीक्षून सांगितले. तर आदित्य ठाकरेंनी गद्दारांवर जोरदार आसूड ओढले.

प्रा. नरेंद्र खेडेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते प्रा. सुषमा अंधारे, रोहित पवार, जयश्री शेळके, आ. राजेश एकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र खेडेकर शेगावला जाऊन सपत्नीक संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले व या लढाईसाठी बळ देण्याचे साकडे घातले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खेडेकर यांनी जंगी शक्तिप्रदर्शन केले. जाहीर सभा आणि त्यानंतर झालेल्या रॅलीला प्रचंड गर्दी जमली, विशेष म्हणजे रणरणत्या उन्हात स्वतः आदित्य ठाकरे, रोहित पवार , सुषमा अंधारे, अंबादास दानवे ही नेतेमंडळी रॅलीत सहभागी झाली.स्वतः आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी झाल्याने बुलडाणेकर जनतेनेही आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी गर्दी केली. थोडक्यात काय तर तळपत्या उन्हात नरेंद्र खेडेकरांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी घाम गाळल्याचे चित्र दिसले, जे पाहून उमेदवार नरेंद्र खेडेकर नक्कीच सुखावले असतील. दरम्यान यावेळी झालेल्या सभेत आदित्य ठाकरे विरोधकांवर चांगलेच तुटून पडले. ज्यांनी गद्दारी केली त्यांना याच मातीत गाडा, नरेंद्र खेडेकरांना दिल्लीत पाठवा असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

देशात बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी संकटात आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकही नवा उद्योग नाही. आता यावर राजकीय परिवर्तन हेच उत्तर असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सुषमा अंधारेंनी त्यांच्या खास शैलीत जिल्ह्यातील खासदार आमदारांचा समाचार घेतला. तुम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेले म्हणता मग लोणार येथील धार बंद केली होती तेव्हा तुम्ही का समोर आला नाहीत? तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व असा सवाल त्यांनी केला. यावेळी अंधारे यांनी आमदार गायकवाड यांच्या आग्यामोहळ वक्तव्याचा देखील विशेष शैलीत समाचार घेतला. कुठे काही असू द्या बुलडाणा जिल्ह्यात नरेंद्रची लाट आहे, ही लाट उष्णतेपेक्षाही भयंकर आहे असे म्हणत खेडेकर यांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार यांनी बोलतांना आता परिवर्तन केवळ महाविकास आघाडीचं करू शकत असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांचा भाषण कमी संवाद अधिक

आदित्य ठाकरे लोकांशी संवाद साधत होते. अनेकदा मध्येच भाषण थांबवून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यासाठी स्टेजवरून आदित्य ठाकरे खाली उतरले..ठाकरेंची ही अनोखी शैली लोकांना चांगलीच भावली.. नरेंद्र खेडेकर यांनी बोलतांना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. खासदार म्हणतात तिकडे आमचा सन्मान होत नव्हता, उद्धवसाहेब भेटत नव्हते..मग चार वेळा आमदारकी, ३ वेळा खासदारकी भेटल्याशिवाय भेटली का? आता का मातोश्री तुमच्या नावावर करून द्यायची होती का ? असा परखड सवाल खासदार प्रतापराव जाधव यांना केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!