Prakash Ambedkar : वंचित काँग्रेस वाद दिवसेंदिवस अधिक वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. एरवी आघाडीचा धर्म पाळत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत स्पष्ट भूमिका घेताना दिसत आहेत. मैत्री मान्य नसल्यामुळे ‘वंचित’ला आव्हान देत कांग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याचे नाना पटोले म्हणाले. आम्ही वंचित सोबत खूप पुढे गेलो होतो.आमचं मत होतं की या वेळेस मताचे विभाजन होऊ नये. असे असताना वंचितने आमची चेष्टा केली. तरी काँग्रेसच्या वतीने मी स्वतः माझ्या हायकमांडला समजावून सांगितले होते. आम्ही पूर्ण तयारीत होतो पण वंचितने ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कॅंडिडेट उभे करण्यास सुरुवात केली. याचा अर्थ त्यांनाच ही मैत्री नको होती हे त्याच्यातून सिद्ध होत होतं. म्हणून तुम्हाला मैत्री नको तर आम्ही कसे थांबणार म्हणून काल आम्ही उमेदवार जाहीर केल्याचे नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये सात पक्ष आहेत. वंचितला सपोर्ट करायचं असेल तर महाविकास आघाडीला करायचं आहे. कोणाला एकाला नाही, परंतु ते महान आहेत त्यावर बोलायचं नाही.परवा मी अकोल्याला जाणार आहे तेथे मत मांडणार असे नानांनी स्पष्ट सांगितले.
ठाकरेंना वंचितचा पाठिंबा
नागपूर मध्ये विकास ठाकरेंना वंचितने पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जनता आता सुजाण झालेली आहे.जनतेला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत.एका व्यक्तीला वाचवण्यापेक्षा संविधान वाचवणे हे देशासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले,आंबेडकर विचारसरणीचा आहे. एका व्यक्तीचे नाही शाहू फुले आंबेडकर विचारसरणी ह्या राज्याच्या जनतेच्या हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेली आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीला संपवण्याचा प्रयत्न काही लोक करतात आहेत त्याला आता उत्तर या निवडणुकी मध्ये लोक देतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
चव्हाणांचे अधिकार संपले
नानांनी यावेळी अशोक चव्हाण यांना स्पष्ट सुनावले. अशोक चव्हाण यांना काँग्रेस बद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे मी कालच बोललो. त्यांच्या भोकर विधानसभेमध्ये त्यांची काय अवस्था होत आहे.लोक त्यांना येऊ देत नाही आहे. हे आपण पाहत आहोत.त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर बोलणं आता टाळावं.काँग्रेसच्या नावाने खूप कमावलं, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगलं. काँग्रेसला कसं संपवायचे हे प्लान केलेलं होतं.पण बरं झालं ते आज आमच्यात नाही. पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलणे टाळले पाहिजे,ज्या आईनी त्यांना मोठे केले त्याच आईची बदनामी करायला ते आज निघाले आहे असा खोचक टोला नाना पटोले यांनी लाखनी येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आले असताना अशोकराव चव्हाणांना लगावला.