Prataprao Jadhav : शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांसमवेत उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी दाखल केला आहे. त्यांच्या समवेत मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ.संजय रायमुलकर, आ.डॉ. संजय कुटे,आ.संजय गायकवाड, आ.आकाश फुंडकर, आणि आ. श्वेता महाले या उपस्थित होत्या.
यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले, विजय शिंदे यांनी अर्ज भरला ते मला उशिरा माहित झालं आज अर्ज भरण्याची गडबड असल्याने आणि त्यांनी अर्ज भरला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आला आहे आणि शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म मी आज जोडलेला आहे.
पाटलांचा ठाकरेंना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहिल्यानंतर शत्रु राष्ट्रही हताश होते. जगातील देश त्यांच्याकडे आदराने पाहतात. देशाचे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी हिंदुस्थानचे नाव संपूर्ण जगात रोशन केले. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि ४०० पार चा नारा पूर्ण करण्यासाठी प्रतापराव जाधव यांना मोठ्या मताधिक्यांनी विजय करा, असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या मोदींना स्विकारलं होतं त्याच मोदींना तुम्ही का नाकारता ? असा खडा सवाल त्यांनी करुन खणखणीत भाषण केले.
Lok Sabha Election : आमदार फुंडकरांनी काढली शिंदेंच्या बंडातील हवा !
शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-रिपाइं.- रयत क्रांती व पिरिपाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज मंगळवार २ एप्रिल रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ. संजय कुटे, राकाँ. नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय रामुलकर, आ. आकाश फुंडकर, आ. संजय गायकवाड, आ. श्वेताताई महाले, आ. वसंत खंडेलवाल उपस्थित होते. तत्पुर्वी स्थानिक गांधी भवनातून भव्य रॅली काढण्यात येवून तिचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झाला. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेना भाजपाची युती केली. त्या युतीच्या भरवशावर आम्ही आज काम करत आहोत.
मोदींचा स्वीकार
बाळासाहेबांनी मोदींना स्वीकारलं होतं. आज तुम्ही स्वार्थासाठी मोदीजींना नकारात आहात, अशी टिका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली. प्रतापराव जाधव म्हणाले, १५ वर्षाच्या कालावधीत विकासाची गंगा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच काळात सुरु झाली. विकासाला अत्यावश्यक असलेले रस्त्यांचे जाळे विणले गेले. अकोला-अकोट-हिवरखेड-सोनाळा-बुरहानपुर- खांडवा या रेल्वे मार्गाच्या भूमी अधिग्रहणाचे काम सुरु आहे. १०९ वर्षापासुन प्रलंबीत असलेला खामगांव-जालना रेल्वे मार्गालाही केंद्राने मंजुरात देऊन राज्य सरकारने ५० टक्के निधीची तरतुद बजेट अंतर्गत करुन त्याला मंत्रीमंडळानेही मंजुरात दिली आहे. बचत गटांच्या महिलांसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. तर बस स्टैंड, रेल्वे स्टेशनवरही विक्री केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशामध्ये विकासाचा रथ सुरु असून त्याची गती वाढविण्यासाठी लोकसभेमध्ये ४०० च्या वर खासदार या निवडणुकीत आपल्याला निवडुन पाठवायचे आहे, असे आवाहन यावेळी आ. संजय कुटे म्हणाले. यावेळी मंचावर माजी खासदार सुखदेव काळे, माजी आ. चैनसुख संचेती, धृपतराव सावळे, तोताराम कायंदे व शशिकांत खेडेकर, भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे व सचिन देशमुख, नरहरी गवई, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, बळिराम मापारी, ओमसिंग राजपुत, भाई विजय गवई, तुषार काचकुरे, नाना पाटील, प्रभाकर डोईफोडे, प्रशांत ढोरे, शंतनु बोंद्रे, देवेंद्र देशमुख, सागर फुंडकर, सुनिल कायंदे, संतोष देशमुख सह भाजपा महिला आघाडीच्या विजया राठी, सेना महिला आघाडी शारदा पाटील, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
जाधवांसाठी शिंगणेंचे आवाहन
खा. प्रतापराव जाधव गेल्या तीन टर्म पासुन बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. प्रत्येक वेळेस त्यांचे मताधिक्य वाढत गेले. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारचा नारा दिला आहे. या ४०० खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याकरीता कार्यकर्त्यांनी सज्ज झाले पाहिजे. विशेष म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात युतीचेच आमदार आहेत. त्यामुळे प्रतापराव यांचा चौकार दिल्लीपर्यंत धडकला पाहिजे. असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.