महाराष्ट्र

Lok Sabha Election : धानोरकरांनीच सांगितले, जातीची कॅसेट वाजवत बसलो असतो तर…

Sudhir Mungantiwar : जात, पात, धर्म, पंथाचा भेदभाव केला नाही

Political News : लोकसभा निवडणुकी निमित्य चंद्रपुरात महायुतीचे सभा पार पडली, जातीचे राजकारण यावर सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षाला उत्तर दिले चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडत आहे. सभा, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशात जातीचे कार्ड खेळण्याचेही प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. आज (ता. २) चंद्रपुरातील शकुंतला लॉन येथे महायुतीची सभा पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, केवळ एखाद्या जातीच्या भरवशावर कुठलीही निवडणूक जिंकली जात नाही. याचे अनेक दाखले इतिहासात बघायला मिळतात. काल-परवा माझ्या पाहण्यात एक व्हिडिओ आला. त्यामध्ये यापूर्वीचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर हे त्यांच्या समाजबांधवांना स्पष्ट सांगताना दिसत आहेत की, ‘केवळ जातीच्या भरवशावर जिंकता येत नाही. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात आपला समाज मोठ्या प्रमाणात आहे. पण मी केवळ जातीची कॅसेट वाजवत बसलो असतो, तर कधीही खासदार झालो नसतो.

वामनराव चटप यांनीही जातीच्या भरवशावर लोकसभा निवडणूक लढवून बघितली आहे. तेव्हा त्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. २ लाख १५ हजाराच्या वर मतदान त्यांना मिळाले नव्हते. तेव्हा समाजाचे तुणतुणे वाजवून जमत नाही. ’बाळू धानोरकर 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांनाही ठाऊक होते की, जातीचे राजकारण करून जनतेची सेवा करता येत नाही. तरीही काही लोक जातीचे अयशस्वी राजकारण करताना दिसतात. मी कधीही जात, पात, धर्म, पंथ याचा भेदभाव केला नाही. भेदभाव करण्याचे काही कारणही नाही. राजकारण हे जनतेची सेवा करण्याचे एक माध्यम आहे आणि हे सेवेचे व्रत घेऊनच आजवर काम केलेले आहे. यापूर्वीही नाही आणि भविष्यात यानंतरही कधी जातिभेद करणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितले.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे. डॉ. कोडवते दाम्पत्य, त्यानंतर काँग्रेसचे आदिवासी नेते डॉ. नामदेव उसेंडी, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे, नंतर काल (ता. 1) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर (Manohar Paunkar) यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, असे विचारले असता, हो करणार आहेत. पण प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे नाव अंतिम झाल्याशिवाय ते जाहीर करायचे नाही, हा शिष्टाचार आहे आणि मी शिष्टाचार पाळणारा माणूस आहे. त्यामुळे आता काही सांगू शकणार नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

मोदींची सभा मध्यभागी..

विधानसभेत 30 वर्ष काम करण्याचा माझा अनुभव आहे. लोकसभेत गेल्यानंतरही हा अनुभव माझ्या सोबत असणारच आहे. मंत्रालयाची खोली न खोली मला माहिती आहे. मैत्रीचे संबंध आहेत. तेव्हा लोकसभेत गेल्यानंतरही विधानसभा मतदारसंघाचा विकास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मतदारसंघात सभा घेणार आहेत. ते ठिकाण बहुधा चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या मध्यभागातील असेल. त्याची चाचपणी सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.(Narendra Modi Public Meet Near Chandrapur & Gadchiroli)

नाही तर लोक म्हणतील..

निवडणूक म्हटली की, प्रचारसभा, रोड शो यांसाठी बॉलिवूड स्टारची मांदियाळी असते. आपण कोणत्या सुपरस्टार्सना बोलावणार आहात असे विचारले असता, मी स्वतःहून कुणालाही बोलावलेले नाही. कारण लोक म्हणतील की, कामे केली नाहीत, म्हणून सुपरस्टार्सना बोलवत आहो. पण तरीही सलमान खान, सुनील शेट्टी यांनी स्वतःहून येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नक्की ठरलेले नाही, पण रवीना टंडन, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड आदी कलावंत स्वतःहून येणार आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!