Buldhana : लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आप-आपली उम्मेदवार जाहीर केलेली असतानाच आता काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरीचे संकेत देत बुलढाण्यातील राजकीय अफवांचा बाजार आज गरम ठेवला. विशेष म्हणजे, हे दोन्हीही नेते निवडणूक अर्ज भरणार असल्याचे संकेत देऊन आपले मोबाईल फोन ‘स्वीच ऑफ’ करून बसले होते.
दोन्ही पक्षांतील बेदखल असलेल्या या नेत्यांनी दिलेल्या या ‘हुल’ची त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याने गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पेल्यातील हे वादळ पेल्यातच शांत होईल, अशी शक्यता राजकीय राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे दोन्हीही नेते पक्षांतर्गत बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणे तूर्त तरी अशक्य आहे वाटत, हे फक्त चर्चेत राहण्यासाठी केलेला प्रपंच असल्याचे अनेकांचे मत आहे.
Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?
बुलढाण्यात महायुती असो की महाविकास आघाडी, यांच्यात चाललंय काय, हे निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली तरी कळायला मार्ग नाही. नामांकन अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल करून एकच खळबळ उडवून दिली होती, तो आपला गेम प्लान होता, असे सांगत आता त्यांनी महायुती महाविक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी अजून त्यांनी नामांकन अर्ज मागे घेतलेला नाही.
विद्यमान आमदारांचे बंडाचे निशाण अजून खाली उतरलेले नसतानाही, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील दोन आमदारांची बंडाचा ध्वज फडकवण्याची तयारी चालल्याचे त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. त्यात महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ तर महायुतीचे म्हणजेच भाजपचे विजयराज शिंदे असल्याची चर्चा आहे. बुलढाण्यासाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीकडून प्रा. नरेंद्र खेडेकर, यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. खासदार जाधवांच्या उमेदवारीला भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेले विजयराज शिंदे यांचा विरोध होता व आहे.
अकोला येथील बैठकीतही विरोध
अकोला येथील पक्षाच्या बैठकीतही त्यांनी हा विरोध दर्शविला होता. तसेच, बुलढाण्याची जागा भाजपकडे घ्या, अशी मागणी शिंदे व भाजपचे जिल्हाध्यक्ष माटे यांनी रेटली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही हा मतदारसंघ आपल्याकडे पाहिजे होता. परंतु, शिंदे गटाच्या दबावापुढे भाजपचे काही चालले नाही व ही जागा शिंदे गटाला सोडावी लागली. “नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक-एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे जो दिला तो उमेदवार एकजुटीने निवडून आणा”, असे आदेश भाजप नेतृत्वाने विजयराज शिंदे यांच्यासह सर्व नेत्यांना व आमदारांना दिलेले आहेत. परंतु, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजपप्रमुख असतानाही याच मतदारसंघात ते शिवसेनेचे माजी आमदार असतानाही त्यांना ‘बॅनर’वरून डावलल्या गेल्यामुळे निमंत्रण असूनही त्यांनी या मेळाव्याला दांडी मारली.
आता तर त्यांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतही शिंदे शिवसेना व भाजपमध्ये फार काही आलबेल आहे, अशातले चित्र नाही. त्यामुळे आपणही उमेदवारी अर्ज भरणार आहोत, अशी हूल त्यांच्यावतीने त्यांनी उठवली गेली आणि राजकीय अफवांचा बाजार गरम झाला. त्यानंतर, त्यांनी त्यांचा फोन ‘स्वीच ऑफ’ केला. याबाबत महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नामोल्लेख टाळण्याच्या अटीवर फक्त एवढेच सांगितले, की “तुम्ही पत्रकारांनी या बाबीकडे लक्ष देऊ नये. ते खरेच अर्ज भरतात का ते पाहू.. ” असे सांगून शिंदे यांना फारसे महत्व देण्यास नकार दिला.