Political News : आपसातील मतभेद, भांडण, गटबाजी यामुळेच काँग्रेसची वाताहत झाली आहे. काँग्रेस जवळपास संपण्याच्या मार्गावर असतानाही पक्षातील नेते सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. अशात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना चंद्रपूर, गडचिरोलीत कॉंग्रेस नेते एकापाठोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. यातील तीन नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते व त्यांची पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करून भाजपमध्ये प्रवेश डॉ. उसेंडी काँग्रेसचे आमदार होते. दोनदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. काँग्रेसच्या तीन नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपची वाट धरल्यानंतरही पक्षातील फुट थांबलेली नाही. चंद्रपूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सोडणाऱ्यांची यादी आणि लाइन आता मोठी होणार आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये गेल्यास चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांतून काँग्रेस जवळपास रिकामी होणार आहे.
जोरदार गटबाजी
काँग्रेसचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच पक्षात अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागली आहे. भाजपने चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित करताच काँग्रेसमधील लाथाळ्या वाढल्या. राजीनाम्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळे अब्जाधीश असलेल्या धानोरकर यांचा प्रचार करणार कोण? असा प्रश्न आहे.