Congress & BJP : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होत आहे. यामध्ये उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे आणि निवडणूक आयोगाने ही माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये मुनगंटीवार यांच्याकडे 15 कोटी 48 लाख 7 हजार 405 रुपयांची मालमत्ता आहे, तर आमदार धानोरकर यांच्याकडे 1 अब्ज 35 कोटी 20 लाख 88 हजार 982 रुपये किमतीची मालमत्ता आहे. या लोकसभेत कोट्यधीश विरुद्ध अब्जाधीश असा मुकाबला होणार, अशी चर्चा रंगली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेली माहिती उमेदवारांनी आपल्या शपथपत्रांमध्ये नमूद केलेली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची आमदारकीची ही सहावी टर्म आहे. यामध्ये तीन वेळा ते मंत्री राहिलेले आहेत. 2014 मध्ये भाजप-शिवसेना सरकारच्या काळात ते वन व अर्थमंत्री होते. विद्यमान सरकारमध्ये मुनगंटीवार वन, सांस्कृतिक कार्य विभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत. तुलनेत प्रतिभा धानोरकर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे खासदार होते. त्यापूर्वी आमदारही होते. धानोरकरांची कारकीर्द तुलनेत कमी काळाची असतानाही त्यांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे बघायला मिळते. मुनगंटीवार यांची संपत्ती 12 पट तर धानोरकर यांची संपत्ती तब्बल 40 पटींनी वाढल्याचे दिसत आहे.
धानोरकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात किती विकास झाला आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात विकासाची किती कामे झाली, याची तुलना आता निवडणुकीच्या काळात होऊ लागली आहे. यामध्ये नेत्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आल्याने मतदारांमध्ये नेत्यांच्या संपत्तीचीही मोठी चर्चा आहे. अशा वेळी कामाची तुलना होणे स्वाभाविक आहे आणि ती मतदारांनी सुरू केली आहे. `संपत्ती जास्त विकास कमी आणि विकास कामांकडे लक्ष अधिक तर संपत्ती कमी’, अशा चर्चा मतदारसंघात रंगल्या आहेत. निवडणुकीत जातीचे कार्ड खेळण्यावरूनही लोक चर्चा करत आहेत. ‘जातीचा उमेदवार बघून मतदान करण्याचा जमाना गेला’, असे लोक बोलताना दिसतात.
मुनगंटीवारांकडे 8.49 कोटींची संपत्ती
भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या 2019 मधील शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 7 लाख 60 हजार रुपयांची चल संपत्ती होती. 2024 मधील शपथपत्रानुसार वाढ होऊन ती 94 लाख 68 हजार 229 रुपयांची आहे. दोन फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. 2022-23 मध्ये वार्षिक उत्पन्न 51 लाख 82 हजार 151 रुपये दाखवले आहे. अचल संपत्ती 5 कोटी 60 लाख 22 हजार 323 रुपये आहे. वडिलोपार्जित संपत्ती 2 कोटी 89 लाख 74 हजार 528 रुपयांची आहे. मुनगंटीवार यांच्यावर बॅंका आणि सहकारी संस्थांचे 4 कोटी 51 लाख 37 हजार 632 रुपयांचे कर्ज आहे. 90 हजार रुपये नगदी रक्कम आहे. 8 कोटी 49 लाख 96 हजार 582 रुपयांचे घर आणि इतर संपत्ती आहे. आयटीआरनुसार 2018-19नुसार उत्पन्न 48 लाख 80 हजार 367 रुपये आहे, ते 2022-23 मध्ये वाढून 49 लाख 82 हजार 150 रुपये आहे.
धानोरकर एवढ्याच्या मालकीण
काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या 2019 मधील शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 1 कोटी 2 लाख 51 हजार 920 रुपयांची संपत्ती होती. आता 2024 मधील शपथपत्रानुसार 40 कोटी 32 लाख 4 हजार 497 रुपयांची संपत्ती आहे. 2022-23मध्ये वार्षिक उत्पन्न 49 लाख 85 हजार 511 रुपये होते. स्वतः खरेदी केलेली अचल मालमत्ता 3 कोटी 7 लाख 98 हजार 180 रुपयांची आहे. मिळालेली संपत्ती 34 कोटी 85 लाख 66 हजार 9 रुपये आहे. उत्पन्नाचे स्रोत शेती आणि व्यवसाय आहेत. 25 लाख 15 हजार 500 रुपये त्यांच्याकडे रोख स्वरूपात आहेत. विविध बॅंका आणि संस्था 77 लोकांचे मिळून 55 कोटी 23 लाख 86 हजार 611 रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. 2018-19 मधील आयटीआरनुसार उत्पन्न 14 लाख 81 हजार 874 रुपये आहे, जे वाढून 49 लाख 85 हजार 511 रुपये झाले आहे. 37 कोटी 93 लाख 64 हजार 189 रुपयांची जमीन आणि घर आहे.