महाराष्ट्र

Lok Sabha Election : बसपाच्या उमेदवारीने निवडणुकीत आणला ट्विस्ट !

BSP : हत्तीची चाल कोणत्या दिशेने यावर सर्वांच्या नजरा

BSP Sanjay Kumbhalkar : कुंभलकर हे किती मते घेतात आणि ते नेमक्या कुणाच्या मतांचे विभाजन करतात यावर या मतदारसंघातील विजयाचे समीकरण ठरणार आहे.

2019च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सहज विजय मिळवला. आता बसपाच्या उमेदवारीने निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आणला आहे. विशेष म्हणजे बसपाने तेली समाजातील उमेदवार उभा केल्याने चुरस अधिक वाढली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत लोकसभेच्या 20 निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जातीय समीकरण आणि तिसऱ्या सक्षम उमेदवाराची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे.

भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा संधी दिली, तर काँग्रेसने नवा गडी, नवा डाव हे सूत्र लावत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीने संजय कुंभलकर यांना, तर वंचित बहुजन आघाडीने संजय केवट यांना उमेदवारी देत निवडणुकीत नवीन ट्विस्ट आणला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा नवीन चेहऱ्यांना संधी देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

या मतदारसंघावर सर्वाधिक 11 वेळा काँग्रेसचे, तर 6 वेळा भाजपचे वर्चस्व राहिले आहे, तर राज्यातील बदललेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नवीन समीकरणामुळे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षांनंतर भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळेच भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधक ठरले. शक्तिप्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यात हे दोन्ही उमेदवार उत्तीर्ण झाले.

31 मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात मतदारांच्या मनात घर करून त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यात कोण यशस्वी ठरतो, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये लढत होणार असली तरी बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर यांच्या उमेदवारीनंतर या लढतीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. यात जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली समाजाची सर्वाधिक मते आहेत. या तिन्ही समाजांच्या मतांच्या समीकरणावरच विजयाचे बरेच समीकरण अवलंबून आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!