Sanjay Gaikwad : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी (ता. 28) लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे विजयाचा चौकार मारणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असतांना त्यांच्याच पक्षाचे आमदार गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. आमदार संजय गायकवाड हे नामनिर्देशन कक्षात दाखल झालेत त्यावेळी त्यांच्या समवेत बुलढाणा शिवसेना तालुकाध्यक्ष धनंजय बारोटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,
बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांना धक्का देत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर आणि धाराशिव मतदारसंघाच्या उमदेवारीवरूनही महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जुंपली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठी बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. अशात अचानक घडलेल्या राजकीय नाट्यानंतर प्रतापराव जाधव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय गायकवाड यांनी अर्ज का भरला माहिती नाही. कदाचित त्यांना एबी फॉर्म मिळावा असावा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.
गायकवाडांचे दोन अर्ज
शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज शिवसेना पक्षाकडून तर दुसरा अर्ज हा अपक्ष म्हणून भरलेला आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी संजय गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर संजय गायकवाड यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अर्ज मागे घेण्यासाठी भरला जात नाही, असे विधान गायकवाड यांनी केले आहे.
कार्यकत्यांचा आग्रह
बुलढाणा लोकसभेत महायुतीचा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसतानाच एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामुळे बुलढाण्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चाना उधाण आले आहे. संजय गायकवाड यांनी अपक्ष आणि शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. आपण कार्यकत्यांच्या आग्रहापोटी उमेदवारी अर्ज भरल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यासंदर्भात पक्षाचे निरीक्षक विलास पारकर यांनी सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड यांनी अर्ज भरल्याने मतदारांमध्ये महायुतीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांचा फोन
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आमदार संजय गायकवाड यांना आला. शिंदे यांनी विचारणा केली की, अर्ज दाखल केला आहे का? यावर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की आपण एकनाथ शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही. मरणार पण एकनाथ शिंदे यांच्यापुढे जाणार नाही. अर्ज मागे घेण्याची तारीख कधी आहे? असे विचारले असता गायकवाड यांनी सांगितले की, 4 एप्रिल ही तारीख आहे. उलट आपण प्रतापराव जाधव यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे काळजी करू नका, असे गायकवाड यांनी शिंदे यांना सांगितले.