Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करीत ही यादी जाहीर केली. 17 जणांची नावे असलेली ही यादी आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली. यादीत महाविकास आघाडीमधील विदर्भाचे दोन मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळाले आहेत. यात बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघांचा समावेश आहे. बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना तर संजय देशमुख यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
नरेंद्र खेडेकर यांनाच संधी
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अखेर नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे मैदानात उतरणार आहेत. नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख होते. सध्या ते बुलढाणामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांच्या नावाला पसंती आहे.
संजय देशमुख मैदानात
पूर्व राज्यमंत्री संजय देशमुख यांना ठाकरे गटाने निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. शिवसेना, भाजप, शिवसेने असा प्रवास केलेल्या संजय देशमुख यांनी घरवापसी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी संधी दिली आहे. संजय देशमुख हे शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ देण्यात आले आहे.
संजय देशमुख हे संजय राठोडांसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र 1999 मधील विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत.
संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मते मिळवली होती.
शिंदे कोणाला देणार उमेदवारी?
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काहीच दिवस उरले असताना महायुतीकडून अद्यापही उमेदवारांचे नाही घोषित करण्यात आलेले नाही. भावना गवळी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. गवळी यांच्या उमेदवारी वरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. त्यांना महायुती तिकीट देणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गवळी यांना उमेदवारी दिली नाही तरी महायुतीत यवतमाळचा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला असल्याने येथ शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला उमेदवारी देणार आणि संजय देशमुख यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.