Political News: अमरावतीत राजकीय वातावरण तापले असताना निवडणुकीचे टेन्शन बाजूला सारून खासदार नवनीत राणा आणि अकोल्याचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आदिवासी आणि बंजारा समाजासोबत होळी साजरी केली नवनीत राणा होळीनिमित्ताने पाच दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत.मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या होळीच्या उत्सवात खासदार नवनीत राणा या आदिवासी संस्कृती आणि परंपरेमध्ये रंगल्या.
खासदार नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांसह मेळघाटात दाखल झाल्या. मेळघाटातील एका छोट्याशा आदिवासी गावांमध्ये त्यांनी एका घरात जात्यावर दळण दळणाऱ्या महिलेसोबत स्वतः दळण दळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जग आधुनिक होत असताना देखील मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपून ठेवली असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.
होळीनिमित्त करण्यात येणाऱ्या आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणा सहभागी झाल्या आणि त्यांनी स्वतःआदिवासी कोरकू नृत्य केले. राणा पाच दिवसांच्या दौऱ्यात मेळघाटातील अनेक गावात त्या भेटी देऊन आदिवासींना होळीच्या शुभेच्छा देत होळी साजरी करीत आहेत. राणा यांनी नवरात्रीनिमित्त केलेले गरबा नृत्य. दहिहांडीच्या उत्सवावेळी केलेला डान्स चांगलाच गाजला आहे. त्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनुप धोत्रे बंजारा समाजासोबत अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका व बोरमळी गावातील तांडा वस्तीत जाऊन धूळवड साजरी केली. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका तांडा येथे बंजारा समाजाने आजही ही परंपरा कायम राखून आहे.
बंजारा समाजातील नागरिकांसोबत अनुप यांनी वाद्य वाजविले व नृत्यावर फेरही धरला. भाजपा बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष संजय इंगळे, राजू काकड, अशोक राठोड, संजय चौधरी, विधानसभा विस्तारक गजानन लुले, गोपाल महल्ले, संदीप राठोड, अविनाश जाधव आदी यावेळी या उत्सवात सहभागी झालेत.