Mahayuti : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. अखेर 21 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये सर्व मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. मंत्रीपदावरून महायुतीतील निर्माण झालेली खदखद शांत होत नाही तोच, आता पालकमंत्री पदासाठी जोरदार ओढाताण सुरू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिल्ह्यातीलच मंत्री आकाश फुंडकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी येथे मंत्री संजय सिरसाट, गुलाबराव पाटील, अतुल सावे यांच्याही नावाची चर्चा महायुतीच्या वर्तुळात आहे. तिकडे छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी अजित पवार यांनी नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचे ‘बळ’ दिले असून, त्यांचीच पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. तर पालकमंत्री जिल्ह्यातीलच द्यावा, अशी मागणी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
पंकजा मुंडे व धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीणभावाचा संघर्ष जोरावर आहे. वाल्मिक कराड यांच्याशी असलेली सलगी धनंजय मुंडे यांना भोवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तिकडे शिवसेना शिंदे गटाचे संजय सिरसाट, भरत गोगावले हे आमचे पालकमंत्रीपद फिक्स असल्याचे जाहीरपणे सांगत सुटले असल्याचे दिसून येते.
रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तसेच सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, संजय कुटे यांच्यासह ज्येष्ठांना डावलण्याने व खाते वाटपातील नाराजीमुळे अंतर्गत खदखद धुमसत आहे. आता महायुतीत पालकमंत्री पदासाठीही जोरदार ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहीणभावांत संघर्ष सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. येथील संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी संशयाच्या भोवर्यात असलेले वाल्मिक कराड यांच्याशी असलेली सलगी धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणा, अशी दा़ट शक्यता दिसत आहे. त्यातच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला येथे विरोधदेखील होत आहे.
तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे व संजय सिरसाट हे दोन मंत्री आहेत. संजय सिरसाट हे आपण फिक्स पालकमंत्री असल्याचे सांगतात. तर रायगडमध्ये आदिती तटकरे व भारत गोगावले हे मंत्री आहेत. येथे भरत भोगावलेंचे फिक्स पालकमंत्री असे बॅनरदेखील झळकत आहेत. सातार्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभुराज देसाई व मकरंद पाटील या चार जणांना मंत्रिपद मिळाले आहे. येथे शिवेंद्रसिंहराजे यांनाच पालकमंत्री करा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिल्ह्यातीलच मंत्री असलेले आकाश फुंडकर यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जात आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जाते. असे झाल्यास गुलाबराव पाटलांना बुलढाण्याचे पालकत्व दिले जावू शकते. पण याअगोदर पालकमंत्री असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्याकडे साफ दुर्लक्ष केले होते, हेही विसरून चालणार नाही.
अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे. येथे अतुल सावे यांना पालकमंत्रीपद दिल्यास संजय सिरसाट यांना बुलढाण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. कारण नजीकच्या जालना जिल्ह्यातून अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. असे झाल्यास आकाश फुंडकर यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, त्यांचे वडिल स्व. भाऊसाहेब फुंडकर हे अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत.
पक्ष जो आदेश देईल ते काम करणार..
कामगार मंत्रालय फार मोठे आहे. अभ्यासानंतर मंत्रिपदाच्या कामकाजाला सुरुवात करेल. मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली. बुलढाणा पालकमंत्रिपदावर आपण दावा केला नसल्याचे फुंडकर यांनी आधीच स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष जो आदेश देईल, ते काम मी करत असतो, अशी सौम्य प्रतिक्रिया फुंडकर यांनी दिली.