Maharashtra police : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत सन 2023च्या तुलनेत 2024मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 10 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यांपैकी केवळ 61 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण जेमतेमच आहे. परंतु, या आकडेवारीवरून दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यामध्ये अद्यापही पोलिसांना यश आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
बुलढाणा हा परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंचा जिल्हा आहे. छत्रपतींच्या स्वराज्यात परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. त्याला कारण होते छत्रपतींचे कठोर शासन. मात्र आता काळ बदलला, कायदा बदलला. परिणामी गुन्ह्यांची संख्या वाढली. नराधमांची हिंमत वाढली. बुलडाणा जिल्ह्यात चालू वर्षात घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे ध्यानात येईल. या वर्षांत बुलडाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल 103 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा 13 टक्क्यांनी वाढला आहे.
बलात्कार
बलात्काराच्या गुन्ह्यांचे वर्गीकरण केले असता बहुतांश गुन्हे लग्नाचे आमिष आणि खोट्या प्रेमप्रकरणातून झालेले दिसतात. चिंताजनक बाब ही की यातील 10 टक्क्यांपेक्षा अधिक गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आहेत. चालू वर्षांत 169 अपहरणाचे गुन्हे घडले आहेत, त्यापैकी 143 जणांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात चालू वर्षांत 378 छेडखानीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा 17 टक्क्यांनी वाढला आहे.
का वाढतेय नराधमांची हिंमत ?
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. सहज हातात असलेला अँड्रॉइड फोन, त्यावर सहज उपलब्ध होणारा पॉर्न, अश्लील कंटेंट यामुळे तरुण वाममार्गाला जात आहेत, हे वास्तव आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये अपवादाने फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा होते. काही प्रकरणे नंतर आपसात निपटवले जातात. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे.
अधिवेशनात गाजला होता मुद्दा..
दंगली, चोऱ्या, घरफोड्या, वरलीचे धंदे, तरुणांमध्ये वाढलेले नशेखोरीचे प्रमाण, अशा विविध अवैध धंद्यांविरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उचलला होता. जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांचा पाढा वाचत गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कारकिर्दीमध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये तीन जातीय दंगली झाल्या, आतापर्यंत लाखोंच्या संख्येने मोटरसायकल चोरी गेल्या. परंतु त्यांचादेखील पत्ता लागत नाही. त्यांची दखलही पोलिस स्टेशनला घेतली जात नाही, घरफोड्या, चोऱ्या, वाटमाऱ्यांची संख्याही हजारांच्यावर गेलेली असल्याचे त्यांनी सभागृहात समोर मांडले होते.
आरोप
मतदारसंघामध्ये भाजीपाल्याप्रमाणे वरली तसेच चकऱ्यांची दुकाने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात मध्यप्रदेशमधून येणारा अवैध गुटखा, दारू सर्रासपणे शहरातील तसेच मतदारसंघातील पानटपऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे हप्ते देऊन विकल्या जाते. हजारोच्या संख्येने मतदारसंघातील अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या. परंतु पोलिस प्रशासनाला त्या शोधण्यातदेखील अपयश आलेले आहे. तीन वर्षांपूर्वी आपल्या घरासमोरील गाडीला समाजकंटकांनी पेटवून दिले होते. त्याचा शोध आतापर्यंत पोलिस प्रशासनाला लावता आला नाही.
बळी
वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक बळी जाताना आपण बघतो आहे. हेल्मेट सक्ती असूनही त्यावर अंमलबजावणी करताना कोणीही दिसत नाही. जिल्ह्यात जुगार व अवैध धंदे हे सर्रासपणे पोलिस अधीक्षकांच्या समोर सुरू आहेत. तरीही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कारण पोलिसांचे लक्ष हे फक्त वसुलीवर आहे, परराज्यातून येणारे बटन नावाचे कॅप्सूल, गांजा, ड्रग्स, बॉण्ड हा नशा करून अल्पवयीन मुलं इतके बेधुंद होतात की त्यांच्याकडून एखादा गंभीर गुन्हा जरी झाला तरी त्यांना कळत नाही, यावरदेखील कोणताही बंधन घातले गेलेले नाही.