Parbhani Beed : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधान आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा येथे आज आंबेडकरी समाज एकवटला. शनिवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा बस स्थानक परिसरात आज सकाळी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुतळा जाळला. यावेळी केंद्र व राज्य शासनाचा निषेध करणाऱ्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या सिंदखेडराजा नगरीसह तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
जनआक्रोश
सिंदखेड राजा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्व आंबेडकरी समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, भारतीय बौध्द महासभा, तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमले. बसस्टँड चौकात अमित शहा यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षक होते. त्यांचा अवमान म्हणजे सर्व देशाचा अवमान आहे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब व सर्व भारतीयांची माफी मागावी, त्यांच्याविरुद्ध देशद्राहाचा खटला दाखल करण्यात यावा. तसेच परभणी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये अमानुष बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत असे वैद्यकीय अहवालात सिध्द झाले आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सिंदखेड राजा यांना देण्यात आले. यापूर्वी चिखली येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी संध्याकाळी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.
Cabinet : अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप !
काय म्हणाले होते शहा?
संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं. त्यांनी म्हटलंय, ‘ही आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता.” अमित शहा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राजकीय वर्तुळातून अमित शहांवर जोरदार टीका होत आहे.