महाराष्ट्र

Pravin Darekar : फडणवीस, गडकरी करत आहेत राज्याचे चित्र बदलण्याचे काम !

Mahayuti : दानवेंनी थोडा धीर धरावा, विश्वास ठेवावा

Devendra Fadnavis : विदर्भात खऱ्या अर्थाने सिंचनाचे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत आहेत. विदर्भात जो विकास होतोय, त्याचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. महाराष्ट्रात आज रस्त्याचे जे जाळे निर्माण होतेय ते गडकरिंच्या माध्यमातून होतेय. हे दोन विकासपुरुष विदर्भ, मराठवाडा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलण्याचे काम करत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात बोलताना केले.

सत्ताधारी पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दरेकर म्हणाले की, महायुतीचे सरकार आल्यावरचे हे पहिले अधिवेशन आहे. विरोधी पक्षनेत्यांनी टीका करणे, सरकारवर बोलणे हे त्यांचे काम आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. परंतु सरकार थांबलेय. अशा प्रकारचे वक्तव्य विरोधी पक्ष नेत्यांनी केले. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला थांबवलेय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांची सुरुवात झाली. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत फडणवीस यांनी रोवली होती.

अपेक्षा

अतिशय गतीने अनेक प्रकल्प पूर्ण झाले. महाराष्ट्राच्या विकासात समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर झाला आहे. त्याचे लोकार्पण करून तो जनतेसाठी खुला झालाय. आज विदर्भात अधिवेशन होतेय. विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रदेश दुष्काळी आहेत. या महामार्गामुळे समृद्ध कृषी नगरे, कृषी आधारित उद्योग भविष्यात निर्माण होतील. रोजगाराच्या संधी विदर्भ आणि मराठवाड्याला निर्माण होतील. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. या नियोजित महामार्गाच्या आराखड्यातील कृषी क्लस्टरचे काम लवकरात लवकर वेळेत करावे, अशी अपेक्षा दरेकरांनी व्यक्त केली.

शहरांतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. प्रवाशांसाठी जलद साधने निर्माण करण्याची गरज आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक या शहरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात केली. या शहरांत काही मार्गांवर मेट्रो सेवा जनतेच्या सेवेत दाखल झाली आहे. मविआचे सरकार असताना या प्रकल्पामध्ये खिळ घालण्याचे काम झाले. दुर्दैवाने मविआच्या अडीच वर्षांच्या काळात हे सर्व प्रकल्प रखडले. परंतु महायुतीचे सरकार आले आणि जलदगतीने या प्रकल्पाची कामे सुरू झाली. आताही महायुतीचे सरकार आलेय. उर्वरित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून वेगवेगळे प्रकल्प आपण आणतोय.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प

एक मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू केला. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते मराठवाड्यात दुष्काळ राहणार नाही, तो एक इतिहास असेल. भविष्यात सुजलाम आणि सुफलाम मराठवाडा पाहायला मिळेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जनतेला बळ देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. 2016मध्ये महाराष्ट्रात खूप पाऊस पडला. परिस्थिती चिंताजनक झाली होती. येथील जिल्ह्यांना जवळपास चार हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. लातूर येथील मिरज येथे रेल्वेने पाणी आणावे लागले होते. त्याचवेळी राज्याचे कल्पक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प योजनेची घोषणा केली होती.

महायुतीच्या पारड्यात मराठवाडाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून माप टाकले. त्यांची अपेक्षा आहे फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आलेय. आता मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम जलदगतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तेही काम सरकारने नियोजित वेळेत पूर्ण करावे. महाविकास आघाडीचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी सिंचन प्रकल्पाचे महत्व समजले नाही. परंतु आमचे सरकार आल्यावर फडणवीसांच्या मार्गदर्शनात सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागले. उद्धव ठाकरेंचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी दोन सुप्रमांना मान्यता दिली. आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस जलसंपदा मंत्री होते, त्यावेळी 129 प्रकल्पांना सुप्रमा देण्याचे काम केले.

सिंचनाचा प्रकल्प

विदर्भात 12 वर्षांमध्ये एकही सिंचनाचा प्रकल्प येऊ शकला नाही. विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अपप्रचार केले. परंतु या सगळ्यांना उत्तर देण्याचे काम अर्थसंकल्प, पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने केले. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. सगळ्यांचा कृषी हा महत्वाचा विभाग आहे. त्यासाठी 2147 कोटी रुपयांची तरतूद केली. अनेक योजनांना तरतूद करून सरकारने आपल्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

सहकारी कारखान्यांवर राज्यातील लाखो शेतकरी अवलंबून आहेत. सहकारी साखर कारखान्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे. विरोधकांनी आमच्यावर टीका केली. परंतु बहिणींनी त्यांच्या अपप्रचाराला थारा दिला नाही. म्हणूनच सरकारने पहिल्या अधिवेशनासाठी या सर्व योजनांसाठी ठोस अशा तरतुदी करून राज्यातील बहिणी, भावांच्या पाठीशी हे सरकार असल्याचे दाखवून दिले. ज्या घोषणा, जे शब्द जनतेला दिले होते, त्या सर्व वचनांची पूर्तता करण्याची पावले पहिल्याच दिवशी उचलली गेली आहेत.

टीका

कापूस, सोयाबीनच्या संदर्भात टीका केली जाते. सरकारने याबाबत दमदार अशी पावले उचलली आहेत. सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू ठेवलीय, अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आपल्या राज्यात राबवित आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना कायमचा दिलासा देण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. या दोन्ही पिकांची मूल्य साखळी विकसित करण्याबाबत शासन स्तरावर योजना सुरू आहेत. परंतु त्याला गती देण्याची गरज असल्याचेही दरेकर म्हणाले.

अनेक नेतृत्व या विदर्भातून झालेत. विदर्भातील जनतेला माहित आहे की, ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी नागपुरात अधिवेशन चालू असले की जिल्ह्यांनुसार बैठका असायच्या. तेच प्रश्न सोडविणारा फडणवीस यांच्यासारखा नेता आज या राज्याचे पुन्हा नेतृत्व करतोय आणि महाराष्ट्राला चांगले दिवस नक्कीच आलेत. परंतु विदर्भासाठी वैभवाचे दिवस फडणवीसांच्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे दिसतील.

राज्याचे नेतृत्व फडणवीस करत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री अत्यंत ताकदीचे आहेत. एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता, त्यांच्या जनतेप्रती असणाऱ्या संवेदना महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री या वादात न जाता आम्हाला महाराष्ट्राचे हीत करायचे आहे. कोणाला काय मिळाले, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार आहे, याची चिंता आमच्या तिन्ही नेत्यांना आहे. त्यातून महायुतीचे सरकार काम करत असल्याचे दरेकर म्हणाले.

रुग्णालयांत अधिकारी, नर्सेस यांची कमतरता आहे. पदभरती मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. याचा आढावा घेऊन करावे. अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी काम होण्याची आवश्यकता आहे. हे अधिवेशन विदर्भात होत आहे. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे मोठ्या इंडस्ट्रीज यायला पाहिजेत, बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले पाहिजे. राज्याला आज नेतृत्व जे लाभलेय, ते विदर्भाचे सुपुत्र आहेत. पर्यावरणाची हानी न करणारे चांगले प्रकल्प आणावे.

गरज

कृषी उद्योग, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने काम करण्याची गरज आहे. कारण विदर्भाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाचा अनुशेष सर्वार्थाने झालाय. तो पूर्णपणे समूळ नष्ट करून विदर्भही राज्यातील पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे सशक्त अशा प्रकारचा विभाग आहे. तीही जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर आहे. सरकार काम करतेय, महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्र प्रत्येक टप्प्याटप्प्यांवर पुढे जाणार आहे.

फडणवीस दिलेल्या शब्दाला जागणारा नेता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व विभागांचा समतोल विकास होईल, अशा प्रकारची 13 कोटी जनतेला अपेक्षा आहे. शेतकरी, शेतमजूर, सहकारी क्षेत्रावर अवलंबून असणारे घटक, बेरोजगार अशांना दिलासा देण्यासाठी शासनाने योजना गतिशील पद्धतीने . 13 कोटी जनतेने जो विश्वास दाखवला, त्याला न्याय द्यावा, अशी विनंतीही दरेकरांनी केली.

दानवेंनी थोडा धीर धरावा..

नेहमीप्रमाणे विरोधकांकडून कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य केले जाते. टीका करायचे काम विरोधक करताहेत. मविआचे सरकार असताना बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला. तत्कालीन गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले. ती परिस्थिती आज नाही. देवेंद्र फडणवीस पूर्वी गृहमंत्री होते आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पोलिस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कुठल्याही बदल्यांत एक रुपयाचा डाग त्यांच्यावर नाही. एक निष्कलंक असा नेता आज राज्याचे नेतृत्व करतोय. त्यामुळे दानवे यांनी थोडा धीर धरावा, विश्वास ठेवावा, असा सल्लाही दरेकरांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!