Doctor Babasaheb Ambedkar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या विधानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला, असा आरोप काँग्रेसने केला. त्याविरोधात गोंदिया जिल्ह्यात जोरदार आंदोलन केले. जयस्तंभ चौकात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी “बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान” आणि “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जयस्तंभ चौकात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर काँग्रेसने भाजपच्या धोरणांवर तीव्र टीका केली. काँग्रेस नेत्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी काँग्रेस संविधान रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
संविधानाचा सन्मान राखण्याचे आवाहन..
भाजपवर डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केल्याचा आरोप करत काँग्रेसने केला. संविधानाचे महत्वही त्यांनी स्पष्ट केले. “संविधानाचा अपमान म्हणजेच सामान्य जनतेच्या हक्कांचा अपमान,” असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. भाजपने आपल्या कृतीतून संविधानाचा सन्मान करावा आणि डॉ. आंबेडकर यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
मोठे जनसमर्थन आणि राजकीय परिणाम..
आंदोलनाला जिल्ह्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. जयस्तंभ चौकात कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी जनभावना अधिक तीव्र झाली आहे. आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बन्सोड़, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचि पी. जी. कटरे, झामसिंग भाऊ बघेले, राजकुमार पुरम निकेश बाबा मिश्रा, उषा मेंढे आदींनी केले. या आंदोलनामुळे गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण आणि सन्मान करण्याचा संदेश दिला आहे.