या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही.
RSS : प्रत्येक राजकीय पक्ष आपली वेगळी ध्येय धोरणे आणि विचारधारेवर चालत असतो. अनेक पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसारच आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे असे सांगतात. या पक्षांच्या बोलण्यात आणि कृतीत बरीच विसंगती असल्याचेही दिसून येते. काही पक्ष एका विशिष्ट धर्माचा अनुनय करतानाही दिसतात. जनसमूहाची मते आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी हे सर्व केले जाते. काही पक्ष परिस्थितीनुरूप आपल्या ध्येय धोरणांमध्ये बदल करतात, हाही राजकीय खेळीचा एक भाग म्हणावा लागेल.
काँग्रेस हा सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाने सर्वाधिक काळ देशावर राज्य केले आहे. आतापर्यंत अनेक राज्ये काँग्रेसशासित होती. या पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारा धर्मनिरपेक्ष, सर्वांना समान संधी व न्याय या भूमिकेवर आधारित होती. आजही एक विशिष्ट जनसमुदाय काँग्रेसचा हात सोडायला तयार नाही. अलीकडे पक्षाचे नेमके धोरण व विचारधारा यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हिंदुत्वाचा पुरस्कार
भारतीय जनता पक्षाने ठामपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. हिंदुत्व ही विचारधारा आहे. हिंदुत्वाची व्यापकता समजून घेणे आवश्यक आहे. ‘हम करे राष्ट्र आराधन’ हा मूलमंत्र स्वीकारून पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. पक्षाचा मूळ पिंड हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, मानवता या विचारांच्या वाढीसाठी समर्पितपणे कार्य करणारे अभेद्य असे संघटन आहे. भविष्यासाठी संस्कारक्षम पिढी निर्माण करणे हा राष्ट्रीय संघाचा प्रमुख उद्देश आहे. देशहितासाठी तसेच मानवतेच्या विकासासाठी समर्पण भावनेने कार्य करण्याचे बौद्धिक संघ शाखेतून दिल्या जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आदर्श विचारधारा अंगीकारून देशाचे नेतृत्व समर्थपणे वाटचाल करीत आहे.
शताब्दी वर्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 यावर्षी झाली. 1925 हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष आहे. संघ विचारांचे सरकार केंद्रात असल्याने शताब्दी महोत्सव उत्साहाने साजरा होणार आहे. देशात ज्या विचारसरणी अस्तित्वात आहेत त्यामध्ये संघ विचारधारा उजवी म्हणून गणली जाते. हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रारंभापासूनच केला. संघ कार्याला विविध आयाम जोडले आहे. धर्म, अध्यात्म, संस्कृती, परंपरा यांची जपणूक झाली पाहिजे. तसेच हिंदुत्व ही संकुचित विचारधारा नाही तर वसुधैव कुटुंबकम असा विशाल दृष्टिकोन त्यात सामावला आहे, असं संघाचं म्हणणं आहे.
अजितदादा दोन हात लांब
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ आहे. महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाला शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने पाठिंबा दिला आहे. या सरकारवर सर्वाधिक प्रभुत्व भारतीय जनता पक्षाचे आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाने भाजप सोबत सख्य केले. आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक बनला आहे. एकनाथ शिंदे भाजप सोबत समरस झाले आहेत. कारण सुरुवातीपासूनच शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा ठामपणे उचलून धरला आहे. अजित पवार मात्र सरकारमध्ये असूनही भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फारसे समरस झालेले दिसत नाहीत. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषय निघतो तेव्हा ते ‘सुरक्षित अंतर’ ठेवून वागतात. त्यामागचे नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी पक्षाची ध्येयधोरणे त्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
अजेंडा जुळत नाही
संघाच्या हिंदूत्वाच्या अजेंड्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुळत नाही असे या पक्षाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. या पक्षाने यापूर्वी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरही आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे पालन करणारा व याच विचारधारेनुसार चालणारा पक्ष आहे अशी भूमिका या पक्षाने यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आज निमंत्रण देऊन ही अजित दादांनी संघाच्या कार्यक्रमास येणे टाळले.
एकनाथ शिंदे यांची ‘दक्ष’ता
नागपूर येथील संघ मुख्यालयात आज आमदारांच्या बौद्धिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर द्वितीय सरसंघचालक मा.स. गोळवलकर उपाख्य गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी संघ कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.लहानपणी आपल्या मनावर संघाचे संस्कार झाले आहेत. संघ आणि शिवसेना यांची विचारधारा एकच आहे. संघभूमी ही उर्जाभूमी आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
तेरा तुझको अर्पण..
भारतीय जनता पक्ष म्हणजे काय हे एकनाथ शिंदे यांना बरोबर समजले आहे. ते परिस्थिती नुसार योग्य पावले उचलून वाटचाल करीत आहे. भाजपच्या कलाने वागणे कसे हिताचे आहे याची समज त्यांच्यात आहे. ही समरसता आणि एकरुपता आपले राजकीय स्थान बळकट करण्याची पुंजी आहे हेही ते जाणून आहेत. धैर्य दाखवून त्यांनी महायुतीच्या सत्ता स्थापनेची वाट सुकर केली. एका योग्याची भूमिका पार पाडली. भाजपनेही त्यांच्या योगदानाची वेळेवर परतफेड केली. मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. आता निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला. वास्तव तात्काळ स्विकारुन एकनाथ शिंदे यांनी हसत हसत मुख्यमंत्री पदाची सुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केली. ‘तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा’ हा सार्थ भाव जोपासला. एकीकडे एकनाथ शिंदे यांची समरसता दिसत आहे. तर दुसरीकडे अजितदादा वेळ, काळ बघुन अजून बरेच सावध वागताना दिसतात. अजूनही त्यांची भूमिका ‘सुरक्षित अंतर ठेवा’ अशीच आहे.