महाराष्ट्र

Farmers Issue : सरकार चर्चांमध्ये; शेतकरी संकटात!

Bhandara : बारदानाअभावी धानखरेदी ठप्प; शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

Vidarbha Farmers : खातेवाटपावरून सरकारमध्ये निव्वळ बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. धान उत्पादक शेतकरी सरकारकडे मोठ्या आशेने बघत असताना अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यातच सरकारमध्ये बिनखात्याचे मंत्री असल्यामुळे कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र अधिवेशनात व्यस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आधारभूत खरेदी केंद्रे म्हणजे धान विक्रीसाठी महत्त्वाची ठिकाणं मानली जातात. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारित सुरू झालेल्या या केंद्रांवर शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपासून धान विक्रीसाठी मोठ्या अपेक्षेने हजेरी लावली होती. मात्र बारदानाच्या तुटवड्यामुळे धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

धान विक्रीसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केंद्रे सुरू करण्यात आली असली, तरी बारदानाच्या अभावामुळे धान साठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या समस्येमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडे कमी दराने धान विकण्यास भाग पडत आहेत. व्यापारी सुमारे 2050 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करत असून, शेतकऱ्यांना यामुळे अपेक्षित दरापेक्षा कमी मिळकत होत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून शेतकऱ्यांना बोनस देण्यात आलेला नाही. त्यामुळे अडचणीत भर पडत आहे. 31 जानेवारीपर्यंत खरेदीची मुदत असल्याने शेतकऱ्यांकडे फक्त दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. बारदाना उपलब्ध न झाल्यास या मुदतीतही धान विक्री होईल की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे बारदाना त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बारदानाअभावी खरेदी प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींवर गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Bhandara News : किटाडीसह सात गावे प्रभारींच्या भरवशावर!

प्रशासनाचे दुर्लक्ष

तुमसर तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल धान पडून आहे. बारदाना उपलब्ध न झाल्याने या धानाची विक्री रखडली आहे. याशिवाय, उघड्यावर पडलेल्या धानाला अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे धान खराब होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

वातावरणातील बदल चिंताजनक

धान खरेदी केंद्रांवर प्रक्रिया ठप्प असल्यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. त्यातच आता वातावरणाचा बदल आणि अवकाळी पावसामुळे धानाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेले धान उघड्यावर पडल्यामुळे नाश होऊ नये, अशी भीती त्यांना सतावत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!