लाखनी तालुक्यातील किटाडी गाव आणि परिसरातील सात गावांचा महसूल कारभार सध्या प्रभारी तलाठ्यांवर चालत आहे. एप्रिल 2023 मध्ये तलाठी प्रवीण कौरवार यांची पदोन्नती होऊन लाखांदूर तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर जवळपास 20 महिने उलटले, पण किटाडी तलाठी कार्यालयासाठी कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती झालेली नाही. यामुळे या गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या अधिकच गंभीर होत चालल्या आहेत.
किटाडी गावाचे महसूल क्षेत्र मोठे आहे. यात किटाडी, गोंदी, देवरी, सायगाव, सानगाव, कवडसी, आणि पहाडी अशा सात गावांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत तलाठी कार्यालयासाठी स्थायी तलाठ्याची आवश्यकता आहे. मात्र, तलाठी प्रवीण कौरवार यांच्या पदोन्नतीनंतर महसूल विभागाने या रिक्त जागेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. सध्या खराशी येथील तलाठी रीना वालमंडाले यांच्याकडे किटाडी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आहे. मात्र, त्या आठवड्यातून फक्त एकदाच किटाडी कार्यालयात येतात, ज्यामुळे ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत. नागरिकांना महसूल कामांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते.
तलाठी कार्यालय प्रभारींच्या भरवशावर असल्याने शेतकऱ्यांचे सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, शैक्षणिक दाखले यासारख्या मूलभूत कागदपत्रांसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी अर्ज करणे, विविध योजना लाभ घेणे, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवणे कठीण झाले आहे. काही शेतकरी कामे उरकण्यासाठी लांब प्रवास करून खराशी येथील तलाठी कार्यालय गाठतात. मात्र, तिथेही कामे वेळेवर होत नसल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.
किटाडीसारख्या गावांमध्ये महसूल कार्यालये योग्य पद्धतीने चालली तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील विश्वास वाढेल. त्यामुळे महसूल विभागाने यावर तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
महसूल विभागाचेही दुर्लक्ष?
महसूल विभागाने या समस्येची अद्याप दखल घेतली नाही. शेतकऱ्यांचे काम लवकर व्हावे यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलणे आवश्यक आहे. अनेकदा निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती पाहता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे किटाडी तलाठी कार्यालयात लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाने या समस्या लवकर सोडवाव्यात, अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.