Nagpur Vidhan Bhavan : राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. सरकार आल्यावर परभणी आणि बीड येथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (17 डिसेंबर) विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला.
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी कस्टडीमध्ये असताना सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी पोलिसांवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही, असे ते म्हणाले.
सभागृहातून बहिर्गमन
बीडमध्ये देखील एक गुंड सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देतो. त्यांचा जीव जाईल इतकी मारहाण होते. सरपंचाचे डोळे जाळले गेले. इतके होईपर्यंत पोलिस गुंडाविरोधात कारवाई करत नाहीत. हा गुंड एका मंत्र्यांच्या विश्वासू आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण दिले जाते का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण हा प्रस्ताव देखील विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यामुळं काँग्रेस संतप्त झाली आहे.
स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक या प्रश्नांवर चर्चा मागत होते. पण हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांचा आवाज दाबला गेला, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. स्थगन प्रस्ताव नाकारल्यानं काँग्रेसने सभात्याग केला. मंगळवारी दिवसभराच्या कामकाजावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला. महायुती सरकारचा निषेध करत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला, की यासाठी सरकारला बहुमत मिळाले आहे का? परभणी आणि बीड प्रकरणी विरोधक घटनास्थळी भेट देणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांना एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घेण्यासाठी दिलं आहे का? गुंडांना संरक्षण देण्यासाठी दिलं आहे का? या दोन्ही मागण्या आम्ही केल्या. आम्हाला अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली नाही. आमचा आवाज दाबला. चर्चेचीही परवानगी दिली नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो. आम्ही सगळे बीड आणि परभणीला जाणार आहोत. मोर्चाही काढणार आहोत. या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.